जोकोवीच म्हणतो ‘हो’, नदाल म्हणतो ‘नाही’, पण कशाला?

rafal Nadal & Djokovic

पुरुषांसाठी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांच्या (Grand Slam Tennis) स्वरूपात बदल करायला हवा का, या मुद्द्यावरून नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) व राफेल नदाल (Rafael Nadal) या जगातील पहिल्या दोन क्रमांकाच्या खेळाडूंमधील मतभेद समोर आले आहेत. व्यावसायिक टेनिसमध्ये केवळ ग्रँड स्लॅम स्पर्धांतच पुरुषांचे सामने कमाल पाच सेटचे (Best of Five) होत असतात. पुरुषांच्या इतर सर्व स्पर्धांमध्ये सामने कमाल तीन सेटचेच (Best of Three) होतात. म्हणून ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांतही पुरुषांचे सामने कमाल तीन सेटचेच व्हावेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

या मुद्द्यावर २० वेळचा ग्रँड स्लॅम विजेता राफेल नदालने म्हटलेय की, अजिबात हा बदल करू नये; कारण हाच एक बदल ग्रँड स्लॅम स्पर्धांना इतर स्पर्धांपेक्षा वेगळा ठरवतो; शिवाय त्याला एक इतिहास आहे. त्यामुळे जे आहे तेच ठीक आहे.

नोव्हाक जोकोवीचने मात्र म्हटलेय की, तो बेस्ट ऑफ फाईव्हच्या बाजूने नाही. जादा स्पर्धा घेण्याला हरकत नाही; पण सामने बेस्ट ऑफ फाईव्ह असावेत याला आपले समर्थन नाही. परंपरेनुसार हे सामने बेस्ट ऑफ फाईव्हच होत आले आहेत. त्यामुळे बदल होईल की नाही माहीत नाही; पण लोकांचे , विशेषतः तरुण पिढीचे लक्ष खिळवून ठेवण्यासाठी हा बदल व्हायला हवा. व्यावसायिकदृष्ट्या आणि खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी ते आवश्यक असल्याचे जोकोवीचने म्हटले आहे.

टेनिसचा खेळ जरा जास्तच परंपरांना चिकटून आहे. त्याचा मला आदर आहे. आणि त्या परंपरा पाळल्यासुद्धा पाहिजेत; पण त्याच वेळी टेनिसने बदलाची फारशी तयारीच दाखवलेली नाही, असे स्पष्ट मत जोकोवीचने व्यक्त केले आहे.

नदालने मात्र याच्या विरोधात मत व्यक्त करताना म्हटलेय की, पाच सेटचे सामने आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांना एक इतिहास आहे. शिवाय पाच सेटचे सामने हे खेळाडूंच्या मानसिक कणखरता व शारीरिक दमखमाची कसोटी असतात. म्हणून ते तसेच असायला हवेत. त्यामुळे बेस्ट ऑफ थ्रीचे सामने जिंकून घेतलेल्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाचे समाधान तेवढेच असेल का, याबद्दल शंका आहे. सलग दोन आठवडे सातत्य व स्ट्राँगनेस टिकवून ठेवण्यातच खरी कसोटी आहे.

सततच्या स्पर्धा आणि त्यांचे ताणतणाव यामुळे खेळाडूंना होत असणाऱ्या दुखापतींमुळे पुरुषांचेही सामने सरसकट बेस्ट ऑफ थ्री व्हावेत असा विचार अलीकडे मांडला जाऊ लागला आहे. मात्र, स्वतः बऱ्याचदा दुखापतींचा सामना केलेल्या राफेल नदालने मात्र बेस्ट ऑफ फाईव्ह सामन्यांनाच समर्थन दिले आहे आणि या बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये फेडरर-नदाल- जोकोवीच या बिग थ्रींनी सर्वाधिक यश मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER