जोकोव्हीच दुखापतींचे नाटक करतो, प्रतिस्पर्धी टेनिसपटूचा गंभीर आरोप

Novak Djokovic

नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) हा सातत्याने चर्चेत आणि वादविवादात राहणारा टेनिसपटू आहे. कोरोनाकाळात (Corona) घेतलेल्या स्पर्धा असतील, लाईनवूमनला लगावलेला चेंडू असेल, मैदान साफ करण्यास केलेली मदत असेल की आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेले समाजकार्य असेल, तो आपल्या चांगल्या-वाईट गोष्टींनी सतत चर्चेत असतो.

आता तो पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. सामन्यादरम्यान दुखापतीचे नाटक करुन तो वैद्यकीय मदतीच्या नावाखाली काही क्षण विश्रांती मिळवण्याचा गैरफायदा घेतो असा आरोप त्याचा प्रतिस्पर्धी स्पेनचा पाब्लो कॕरेनो बस्टा (Pablo Carreno Busta) याने केला आहे.

फ्रेंच ओपनमध्ये या दोघांचा सामना झाला त्यात तो मानेला पट्ट्या लावून खेळताना दिसला शिवाय सामन्यादरम्यान त्याने डाव्या मनगटावर आपल्या ट्रेनरकडून उपचारही करुन घेतले होते. बुधवारच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिला सेट गमावताना तो जोकोवीच त्रस्त दिसला. त्याने वैतागात आपल्या मांडीला रॕकेट मारल्याचेही बघायला मिळाले. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये जोकोवीचने गमावलेला हा पहिला सेट होता.

जोकोवीच त्रस्त दिसत असला तरी तो दुखापतींचा केवळ देखावा करतो, प्रत्यक्षात तेवढे गंभीर काहीच नसते असा आरोप पाब्लो कॕरेनो बस्टाने केला आहे. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना बस्टाने 6-4, 2-6, 3-6, 4-6 असा गमावला.

पाब्लो कॕरेनो बस्टाने म्हटलेय की, ज्या ज्या वेळी सामन्यात बिकट स्थिती असते त्या त्या वेळी तो वैद्यकीय मदत घेतो. बऱ्याच काळापासून तो हे करत आलाय. मला हे माहितच होते. युएस ओपनमध्ये हे घडले. आता फ्रेंच ओपनमध्येही आणि पुढेही होत राहिल हे मला माहित आहे. तो अडचणीत असला आणि प्रतिस्पर्धी चांगला खेळत असला तर तो हे उद्योग करतो. त्यांच्या खांद्यात खरोखरीच त्रास होता का हा मानसिक आजार आहे माहित नाही, पण तो मला विचलीत करू शकला नाही. नेमके काय आहे ते त्यालाच विचारा असेही बस्टाने पत्रकारांना सूचवले आहे.

गेल्या महिन्यात याच बस्टाविरुध्दच्या सामन्यात युएस ओपनदरम्यान लाईन वूमनला चेंडू लगावल्याने जोकोवीचला बाद करण्यात आले होते.

जोकोवीचने म्हटलेय की, या सामन्यासाठी मैदानात उतरतानाच मला बरे वाटत नव्हते. सरावादरम्यान काही तरी घडले. माझ्या मानेत व खांद्यात त्रास होता. पण मी त्यात फारसे लक्ष घातले नाही. आता मला बरे वाटतेय. अजुनही मी स्पर्धेत आहे. त्यामुळे मी या विषयावर फार काही बोलणार नाही. सामना जसजसा होत गेला तसतसे मला बरे वाटत गेले. जोकोवीचचा उपांत्य फेरीचा सामना आता ग्रीसच्या स्टिफानोस सीसीपासशी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER