जोकोवीचला ‘ह्या’ देशाकडून खेळायची होती ऑफर

Djocovic

टेनिसमधील सर्वांत यशस्वी आणि सर्वांत  लोकप्रिय खेळाडूंपैकी नोव्हाक जोकोवीच हा एक आहे याबद्दल शंकाच नाही. याबद्दल त्याचा देश ‘सर्बिया’ला निश्चितपणे त्याचा अभिमान असेलच; पण जोकोवीचचा अभिमान वाटावा असे सर्बियाकडे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे अतिशय आकर्षक ऑफर येऊनसुद्धा त्याने आपले राष्ट्रवादत्व न बदलल्याचे. नाहीतर कितीतरी व्यावसायिक टेनिसपटूंनी आपला मूळ देश बदलून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्याचे आणि त्या देशासाठी खेळल्याची उदाहरणे आहेत; पण जोकोवीच म्हणाला…नाही! मी खेळेल तर सर्बियासाठीच! आपल्याला दुसऱ्या देशाकडून अशी ऑफर आली होती हे रहस्य जोकोने अलीकडेच एका मुलाखतीत उघड केले.

याबद्दल अधिक माहिती देताना तो म्हणाला की, ज्युनिअर गटात आंतराष्ट्रीय पातळीवर मी चमकदार कामगिरी करत होतो. त्यामुळे अर्थातच एजंट लोकांचा माझ्यावर डोळा होताच. त्यांनीच मला ब्रिटनच्या नागरिकत्वाची ऑफर दिली होती आणि ती अतिशय आकर्षक आणि भुरळ पडावी अशी ऑफर होती. ती स्वीकारली असती तर आमच्या सर्व समस्या मिटल्या असत्या; पण मी ती नाकारली. मला हे करायचे नको होते; कारण इंग्लंडमध्ये माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते.

माझे मित्र, माझे कुटुंब, माझे आयुष्य जिथे गेले, माझी भाषा आणि माझ्या देशातच मला राहायचे होते. त्याच्या आईलासुद्धा  नोव्हाक सर्बियासाठी जसा खेळेल तसा ब्रिटनसाठी खेळू शकणार नाही असे वाटत होते. सर्बिया सोडून न गेल्याचा जोकोवीचला आनंद असेल तसाच आनंद सर्बियालासुद्धा हा यशवान खेळाडू देशातच राहिला असल्याचा असेल.

त्याने आतापर्यंत आपल्या कर्तबगारीने त्यांचा गौरव वाढवलाच आहे आणि त्यात आणखी भर टाकण्याचे त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आताच टेनिसमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये (ग्रेटेस्ट प्लेयर्स ऑफ ऑल टाईम) त्याची गणना केली जात आहे. सध्या तो १७ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा धनी आहे आणि रॉजर फेडररच्या सर्वाधिक २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या विक्रमापासून तो फक्त तीन पावले दूर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER