दिवाळी खरेदीची बाजारात लगबग

Diwali

पुणे : यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसत आहे. दिवाळी आठ दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठ सज्ज झाली. खरेदीची लगबग शहरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. फराळाचे पदार्थ आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे.

शहरासह बाजारपेठांमधील साहित्यांची आवक-जावक वाढू लागली आहे. बाजारपेठा फराळापासून ते फटाक्‍यांपर्यंत सज्ज झाल्या आहेत. दिवाळी साहित्यासोबतच कपडे आणि इमिटेशन दागिन्यांची खरेदी करताना अनेक जण दिसत आहेत.कपडे, रांगोळीचे रंग, कंदील, दिवे आदी गोष्टींची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात एकच गर्दी उसळली आहे. साड्या, पंजाबी ड्रेस, कुर्तीज, शर्ट, पॅंट याबरोबरच टीव्ही, फ्रीज अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे बुकिंग ग्राहक करत आहेत.

कपड्यांमध्ये पुरुषांची लिनन, तसेच जॅकेट कुर्त्याला पसंती मिळत आहे. महिलाचा सिल्क, बनारसी साड्यांसह, कॉटनमध्ये आलेल्या नवीन मटेरिअलच्या खरेदीकडे कल आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कापड दुकानदारांना माल खरेदीसाठी बनारस, तामिलनाडूला पोहचता आले नाही, तरी ही बंगळूर, गुजरातमधून मालाची आवक सध्या सुरू आहे. सोने-चांदीचा बाजार दिवाळीच्या निमित्ताने तेजीत आला आहे. नेकलेस, सोन्याच्या पाटल्यासह, राणी हार अशा दागिन्यांची ऑर्डर मिळत आहेत. यंदा बाजापेठेतून चिनी माल हद्दपार झाल्याने स्वदेशी थ्रीडी, कॅन्डल लाईट पणती तसेच, दीपमाळा, कागदी आकाश कंदिलाची खरेदी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाहेर जाताना मास्क घालणे आवश्‍यक आहे. दुकानात प्रवेश करताना सॅनिटायझरनं हात स्वच्छ करावे. गर्दी असणाऱ्या दालनात जाणे टाळावे. सुरक्षित अंतर राखून खरेदी करावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER