दिवाळी लॉकडाऊनमुळे `संस्मरणीय’ होणार…

Diwali.jpg

Shailendra Paranjapeकरोना लॉक़डाऊनचा सहावा टप्पा जाहीर करताना राज्य सरकारनं ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन राहणार असल्याचं सांगितलंय. दिवाळी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. वास्तविक, नवरात्रीतच बाजारपेठांमधे गर्दी दिसू लागली होती आणि दसऱ्यापासून खऱ्या अर्थाने अनलॉकपर्व पूर्णांशाने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. पण दिवाळीच्या सणाच्या वेळी गर्दी होऊन करोना वाढण्याचीं शक्यता असल्याचे कारण सांगून दिवाळीतही लॉकडाऊन ठेवण्यात आलाय.

राज्यातल्या सरकारचे निर्णय बघितले की ते घेतले जाताना सर्वांवर समान अन्याय करायचा, अशी भूमिका घेतली जातीय की काय, अशीच शंका येते. खरे तर करोनाचा मृत्यूदर अवाक्यात आलाय, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्वद टक्क्यांच्याही वर गेलेय. असं असताना करोनाची भीती बाळगून ऐन दिवाळीतही लॉकडाऊन करणं योग्य नाही.

सरकारला अर्थचक्राला गती द्यायचीय म्हणून एकापाठोपाठ एक याप्रमाणे विविध क्षेत्रं खुली केली जाताहेत. तसं करताना सरकारनं कधीच मिशन बिगिन अगेनचा सविस्तर आराखडा किंवा प्लान जनतेसमोर ठेवलेला नाही. थिएटरवाले, ग्रंथालयवाले, मंगल कार्यालयवाले असोत की दुकानदार, मॉलवाले वा जिमवाले, रेस्टॉर्ट हॉटेलवाले असोत की बारवाले, शिष्टमंडळ भेटीनंतर त्या त्या क्षेत्रातल्या लोकांकडूनच सूचना घेऊन एसओपी म्हणजे आदर्श कार्यप्रणाली तयार करायची आणि त्याला मिशन बिगिन अगेन म्हणायचं, असला उद्योग सुरू आहे.

आता ३० नोव्हेंबरपर्यंत सरकारनं मंदिरं आणि शाळा सुरू करायच्याच नाहीत, असं ठरवल्याचं स्पष्ट झालंय. थोडक्यात बाजारपेठात, जिममधे, हॉटेलमधे, सगळ्या उद्यानांमधे कोठेही जा करोना पसरणार नाही पण मंदिरात, शाळात मात्र तो पसरणार, असलं अजब लॉजिक या ताज्या निर्णयामागे आहे.

पुण्यामधे सार्वजनिक उद्यानं खुली करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. दर वर्षी दिवाळीच्या सणाला ऐतिहासिक सारस बागेत जाऊन तळ्यातल्या गणपतीचं दर्शव घेऊन सणाची पहाट साजरी केली जाते. हजारोंच्या संख्येनं लोक सारस बागेत आणि शहरात विविध ठिकाणी जमतात. हॉटेलांमधे बसायला जागा नसते.

आता सारसबाग हे सारव्जनिक उद्यान आहे. तेथे दिवाळीत नवे कपडे घालून हजारोंच्या संख्येनं पुणेकर जमणार पण त्यांना सारसबागेतल्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेता येणार नाही. कारण मंदिरात गेलं तर करोना पसरतो पण मंदिराबाहेर बागेत फिरलं तर तो पसरत नाही.

जिममधे, मॉलमधे, अगदी एखाद्या स्पेसालिस्ट डॉक्टरच्या दवाखान्याबाहेरही लोक गर्दी करतात, हे साधार दाखवता येईल. भाजी मंडइपासून ते दुकानं, बाजारपेठा, तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यासह फर्गसन रस्ता असो की लष्कर भागातले रस्ते सुटीच्या दिवशी आणि संध्याकाळी गर्दी हमखास दिसू लागलीय पण साधारण त्याच प्रकारची माणसं मंदिरात, शाळांमधे मोजक्या वेळासाठी आली तर मात्र करोना पसरतो. याला अजब लॉजिक म्हणावं लागेल किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे अहंकार. कारण भाजपा मागणी करतंय त्यामुळं मंदिरे खुली करणारच नाही, हा अट्टहास राजकीयदृष्ट्या कदाचित तात्कालिक सोयीचा वाटेल पण त्यातून दीर्घकालीन नुकसानच संभवते.

ऐन सणासुदीला पोलीस नो पार्किंगसह अनेक प्रकारचे वाहतूक उल्लंघन रोखण्यासाठी पहाटेपासूनच तैनात असतात. दसरा दिवाळीच्या खरेदीला शिताफीनं दुचाकीस्वाराला पकडून त्याचा सण कायमचा संस्मरणीय करण्याच्या या पोलिसी कौशल्याचं कौतुक करावं तेवढ थोडं. आता दिवाळीतही गर्दी करू नका हे सांगत आणि शिट्ट्या वजवत पोलीस बांधव पुणेकरांची दिवाळी संस्मरणीय करणार, यात शंका नाही.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER