तोडणी मजूरांची उसाच्या फडातच दिवाळी

तोडणी मजूरांची उसाच्या फडातच दिवाळी

सांगली : ऊस हंगामात वर्षातील पाच महिने गाव सोडून कुटुंबासह शेकडो मैलावरील परजिल्ह्यात यायच. लाखभर रुपये घेतलेला ॲडव्हान्स फेडण्यासाठी पहाटेपासून सायंकाळपर्यंत हाडाची काडं होईपर्यंत राबायचं. पाल्याच्या खोपीत सांजवेळी कारभारनी भाकरी थापटताना पडणारा मंद प्रकाश हाच काय तो, या ऊसतोडणी कामगारांची (sugarcane-workers) दिवाळी (Diwali) दिवशीची दीपमाळ. पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या सुमारे दीड लाख उसतोडणी कामगारांची दुर्दैवाने यंदाची दिवाळीही यापेक्षा वेगळी नाही.

रोज पहाटे न चुकता कडाक्याच्या थंडीत ऊसाचा फड गाठायचा. कडूस पडेपर्यंत शेकोटीच्या उजेडात ऊसावर कोयता चालवायचा. त्यानंतर रात्री केलेली बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला कोरड्यास खावून पोटाची आग भागवायची. लगेच तुटलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधून डोकीवरुन गाडीत भरायच्या. बैलगाडी सरासरी दहा किलोमिटर हाकत कारखान्यावर आणायची. दिवसभर राबून खोपीत आल्यावर गृहिणींनी भाकरी बडवायच्या तयारीला लागायच. आठ दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर ऊसाची गाडी रिकामी झाल्यावरच पाल्याच्या खोपीत विसावा घ्यायचा. असा नित्याचा या हातावर पोट असणाऱ्या घटकाचा ठरलेला दिनक्रम.

ऊसतोडून तो वाहनात भरल्यानंतर टनाला २७५ रुपये हातात पडतात. बैलजोडी असेल तर टनास प्रति किमी दहा रुपये प्रमाणे वाहतुकीच्या खर्चासह एका हंगामात ॲडव्हान्स घेतलेले लाखभर रुपये कसेतरे फिटतात. वर्षाच्या ३६५ दिवसातील दिडशे दिवस उसतोडणी असा अक्षरश: जनावरासारखा राबत असतो. वयस्क मजूर, अल्पवयीन मुली, लहान मुले, शिक्षण घेणारी मुले यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होण्याची गरज आहे, तरच या कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दीपोत्सव येईल.

तान्हुली मुले आईसोबत फडात येतात. ऊसाचा पाला हाच त्या छकुल्यांचा बिछाना. किंचित मोठी शेजारची मुले या तान्हुल्यांना खेळवत असतात. मध्येच उसतोडणी थांबवून पोटच्या गोळ्याला दूध पाजायला धावणारी माय. त्यानंतर पुन्हा तोडणी आणि मोळी बांधणी काम सुरु हे ऊस हंगामात सर्रास दिसणारे चित्र आहे. साखरेचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात दीपावलीचा प्रकाश कधी येईल ? कोरोना असो वा नसो फडातील वास्तव मात्र अधिक भीषण होताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER