स्पर्धा परीक्षांपासून दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाहीत- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : दिव्यांग विद्यार्थ्यांना (Divyang students) कोणतीही स्पर्धा परीक्षा देण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना लेखनिक द्यावा लागेल. न्यायालयाच्या आदेशामुळे अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना लिहिता येणे शक्य नाही त्यांनाही यूपीएससीसह सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्याची संधी मिळायला हवी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडीपाठासमोर यूपीएससीच्या अधिसूचनेविरोधात उमेदवाराने याचिका दाखल केली होती. या अधिसूचनेद्वारे DOPT (Department of Personnel & Training) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फक्त बेंचमार्क दिव्यांग व्यक्तींनाच लेखनिकाची सुविधा देण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिला आहे. न्यायालयानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक द्यावा लागेल. यासंबंधी न्यायालयाकडून केंद्र सरकारला तीन महिन्यांत मार्गदर्शक तत्त्वे व मानदंड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिव्यांग उमेदवाराच्या अधिकारांचे रक्षण करताना सर्व स्पर्धा परीक्षा देण्याची संधी निर्माण केली जाऊ शकेल. माहितीनुसार याचिकाकर्ते, क्रोनिक न्यूरॉलॉजिकल व्याधीने ग्रस्त आहेत. हा उमेदवार अधिनियमातील निकषांत बसत नाही. अशांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. दिव्यांगतेचे प्रमाणपत्र केवळ सहा टक्के होते, जे नियमात बसत नव्हते, असे न्यायालयाने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER