औरंगाबादमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कक्ष स्थापन

Aurangabad

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्ग आजाराच्या दरम्यान दिव्यांगांना विविध सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा स्तरीय दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांसाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा स्तरीय दिव्यांग कक्षामध्ये 12 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिव्यांग व्यक्ती कक्षामध्ये फोन करू शकतात.

तसेच तालुका स्तरीय गट विकास अधिकारी यांना तालुका नोडल अधिकारी तथा ग्रामसेवकांना ग्रामपंचायत स्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना (हालचाल करू न शकणाऱ्या) जीवनावश्यक वस्तुंचे घरपोच वाटप करावे.

ज्या दिव्यांग व्यक्ती अति तीव्र अपंगत्व असलेल्या किंवा अंथरूणाला खिळुन आहेत अशा व्यक्तींना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, रूमाल, फिनेल इ. बाबी स्थानिक प्रशासनाने त्यांच्या निधीतून द्याव्यात अशा सूचना दिल्या. तसेच संबंधित पुरवठा विभागाने एक महिना पुरेल इतके धान्य रेशन दुकानातून देण्यात यावे यासाठी दिव्यांग व्यक्ती किंवा त्याऐवजी त्या घरातील कोणीही व्यक्ती आल्यास तात्काळ (विना रांग) रेशन द्यावे. संबंधित पोस्ट ऑफीस, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था नागरी, शहरी बँकांमधून दिव्यांगांना रांगेत न थांबवता तात्काळ सेवा देण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींना पुढील महिन्याची पेन्शन याच महिन्यात द्यावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या माध्यमाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, ज्या स्वयंसेवी संस्थांना दिव्यांगांना मदत करावयाची आहे त्यांनीही पुढे यावे. तसेच जिल्हास्तरीय दिव्यांग कक्षातील नोडल अधिकारी श्रीमती ज्योती राठोड (मो. 9960010525), सहायक श्रीमती सुमित्रा साळुंके (7798573315), अभिजीत जोशी (9226925915), के.बी. निकम (9764565299) यांना संपर्क करावा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक

ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्‍हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिधा, आरोग्य औषध यासंबंधी काही समस्या असल्यास तसेच काही आवश्यकता भासल्यास 0240 2331077 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे.