
नागपूर :- नागपूरच्या कामठी रोडवर लघुवेतन कॉलनीत राहणाऱ्या एका इसमाने पहिल्या पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी मिळविलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केल्याने हा इसम आता एकाच वेळी दोन बायकांचा दादला झाला आहे!
या इसमाचे त्याच्या पहिल्या पत्नीशी सन २००७ मध्ये लग्न झाले. पती नागपूरमधील व पत्नी मुंबईत नोकरी करणारी. जेमतेम दोन महिने एकत्र राहिल्यावर दोघेही कायमचे वेगळे राहू लागले. दोन वर्षांनी पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. पत्नी छळ करते व ती विनाकारण वैवाहिक घर सोडून निघून गेली, या मुद्द्यांवर त्याने घटस्फोट मागितला होता. नागपूरच्या (Nagpur) कुटुंब न्यायालयाने ऑगस्ट, २०१८ मध्ये त्याला घटस्फोट मंजूर केला.
घटस्फोट मंजूर होताच त्याविरुद्ध पत्नीला अपील करण्यासाठी कायद्याने उपलब्ध असलेली मुदत संपण्याचीही वाट न पाहता या पठ्ठ्याने डिसेंबर, २०१८ मध्ये दुसरा विवाह केला. या दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. हा इसम दुसरी पत्नी व मुलांसह आता सूरतमध्ये वास्तव्याला आहे.
दरम्यान, घटस्फोट मंजूर करण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पहिल्या पत्नीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले. ते मंजूर करून न्या. ए. एस. चांदूरकर व न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठाने घटस्फोट रद्द केला. परिणामी घटस्फोट दिलेली ही पहिली पत्नी आता पुन्हा त्या इसमाची लग्नाची बायको झाली आहे.
अशा प्रकारे घटस्फोटाच्या विरोधात अपील केले जाण्याआधीच केलेल्या दुसऱ्या विवाहाचा कायदेशीर दर्जा काय, यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निकाल पाहता असे दिसते की, असा दुसरा विवाह बेकायदा ठरत असला तरी तो अवैध ठरत नाही. म्हणजे पहिल्या पत्नीला दिलेला घटस्फोट अपिलात रद्द झाला तरी तिला घटस्फेट देणारा पती आणि त्याची दुसरी पत्नी यांचे वैवाहिक संबंध अबाधित राहतात. यावरून असे दिसते की, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आताच्या निकलामुळे या इसमाला आता कायदेशीर लग्नाची पहिली पत्नी व बेकायदेशीर लग्नाची दुसरी पत्नी अशा दोन बायकांचा दादला म्हणून राहावे लागणार आहे.
(टीप : या प्रकरणातील पती किंवा त्याच्या दोन्ही पत्नी यांना व्यक्तिगत जीवनात कोणताही त्रास होऊ नये यासाठी बातमीत त्यांची कोणाचीही नावे मुद्दाम दिलेली नाहीत.)
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला