
डेहराडून: बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा ज्याच्यावर नोंदलेला आहे अशा आरोपीची आलिशान ‘ऑडी’ (Audi) मोटार सरकारी कामासाठी वापरण्याचे ‘गंभीर बेशिस्त वर्तन’ केल्याच्या आरोपावरून उत्तराखंडमधील डेहराडूनचे जिल्हा न्यायाधीश प्रशांत जोशी (Prashand Joshi) यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने हा प्रशासकीय आदेश जारी केला.
खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत न्यायाधीश जोशी निलंबित राहतील व त्यांना त्या काळात निम्मा पगार व महागाईभत्ता मिळेल. या आदेशानुसार जिल्हा न्यायाधीश जोशी यांनी हायकोर्ट गेस्ट हाऊसमध्ये ‘कॅम्प कोर्टा’साठी २१ व २२ डिसेंबर रोजी डेहराडूनहून मसुरी येथे जाण्यासाठी स्वत:च्या सरकारी मोटारीऐवजी केवल किशन सोईन या आरोपीच्या मोटारीने प्रवास केला. सोईन याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा डेहराडूनच्या राजपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून तो रद्द करण्यासाठी त्यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
ही खासगी मोटार सरकारी आहे असे भासविण्यासाठी तिची नंबर प्लेट झाकून त्यावर ‘जिल्हा न्यायाधीश’ अशी पट्टी चिकटविण्यात आली होती. शिवाय गेस्ट हाऊसपाशी पोहचल्यावर ही मोटार आत न नेता बाहेर उभी करण्यात आली, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला