सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : ३४ लाख रुग्णांना जादा पैसे परत करण्याचे आदेश

Shekhar Singh

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील अनेक रुग्णांलयांनी जादा पैसे उकळल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh)  यांनी तपासणी पथके नेमून चौकशी केली. १२३ रुग्णालयांनी तब्बल ३४ लाख ४५ हजार रुपये जादा घेतल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णालयांना कडक ताकीद देत, रुग्णांचे जादा घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांकडून विविध रुग्णालयांनी नियमापेक्षा जास्त बिले आकारत वसुली केल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. जिल्हाधिकारी सिंह यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. तक्रार असलेल्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची पथके नेमली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध खासगी रुग्णालयांत कोरोना आजारावर उपचार करण्यात येत आहेत.

परंतु, या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारे बिल हे शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे देण्यात येते की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रुग्णालयनिहाय देयक तपासणी पथके तयार केली होती. त्यात नोडल अधिकारी व एका ऑडिटरचा समावेश होता. १ हजार २३४ रुग्णांच्या बिलांची तपासणी केली. १२३ कोरोनाबाधित रुग्णांकडून ९७ लाख २४ हजार रुपये आकारण्यात आले होते. या पथकाकडून कोरोनाबाधितांच्या बिलांत जादा आकारण्यात आलेली तब्बल ३४ लाख ४५ हजार इतकी रक्कम कमी करून ती परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER