
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शुक्रवार मध्यरात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. त्यापुर्वी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह (M.D. Singh) स्वत: रस्त्यावर उतरले. स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावला.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ शहरासह, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्ण संख्येचा आलेख वाढता आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांनी बसस्थानक चौकात आकस्मिक भेट दिली. जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्याच्यासोबत तहसीलदार कुणाल झालटे, सुनील बल्लाळ, उपस्थित होते. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क लावण्याची विनंती करीत दंड ठोठावला. कोरोना कमी करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर अत्यंत आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. बाजारापेठेत सर्रासपणे नागरिकांचा विनामास्कचा वावर सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वत: फिल्डवर उतरले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला