सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू; ७२ पथकांमार्फत ५ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम वाटप

mhnews2 7

सांगली : जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसलेल्या तालुक्यांमध्ये सानुग्रह अनुदान वितरण सुरू झाले असून १८३ पथके पोलीस बंदोबस्तासह नेमण्यात आलेली आहेत. त्यापैकी 72 पथकांमार्फत दुपारी 4 वाजेपर्यंत 5 कोटी 19 लाखाची रक्कम वाटप करण्यात आली. पूरबाधित प्रत्येक कुटुंबाला मदत मिळेपर्यंत हे वितरण सुरूच राहील. कोणतेही कुटूंब यापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

सानुग्रह अनुदानाची रक्कम मिरज ग्रामीणमध्ये 55 लाख, शिराळा तालुक्यात 29 लाख, वाळवा तालुक्यात 15 लाख, पलूस तालुक्यात 1 कोटी 50 लाख, तर सांगली शहरामध्ये 2 कोटी 70 लाख रूपये अनुदान आज दुपारी 4 वाजेपर्यंत वाटप करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात महापूराने अनेक लोक विस्थापीत झाले आहेत. अनेकांच्या उपजिवीकेचे साधनच हिरावले गेले आहे. आता पूर ओसरू लागल्याने लोक आपआपल्या घराकडे जात आहेत. त्यांची घरे, मालमत्ता यांची अपरिमीत हानी झाली आहे. अशा स्थितीत त्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने कपडे व भांडी यासाठी शहरी भागात प्रति कुटुंब १५ हजार रूपये तर ग्रामीण भागात १० हजार रूपये सानुग्रह अनुदान घोषित केले आहे. त्यापैकी 5 हजार रूपयांची रक्कम रोखीने देण्यात येत आहे. नैसर्गीक आपत्तीमध्ये २ दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र पाण्यात बुडले असल्यास अथवा घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास अथवा पुर्णत: क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे, भांडी, घरगुती वस्तुंकरिता सदरचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. याबरोबरच नुकसानीचे पंचनामेही सुरू आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पूरबाधित क्षेत्रातील मृत जनावरांचा पंचनामा करताना मालकांचे जाबजबाब तसेच मृत जनावरासोबत संबंधित कुटूंबातील व्यक्तीसह त्या संबंधित गावचे तलाठी/ग्रामसेवक/पोलीस पाटील यांचे फोटो असावेत. पंचनामा झाल्यानंतर मृत जनावरांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी. ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रोगराई, दुर्गंधी, जंतू संसर्ग इतरत्र पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.