आमदारांच्या निधीतून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे करणार वाटप; पटोलेंची घोषणा

Nana Patole - Maharashtra Today

मुंबई :- माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत काँग्रेस पक्षाने विविध सामाजिक उपक्रम राबविले. या संकटकाळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून नागरिकांच्या मदतीसाठी १११ अ‍ॅम्ब्युलन्स तर ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे, अशी घोषणा काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष कायम संकटकाळात या देशातील नागरिकांसोबत उभा राहिला आहे. कोरोनाकाळातही काँग्रेस पक्षाकडून मदतकार्य सुरूच आहे. आज राजीव गांधी यांच्या हौतात्म्यदिनी राज्यभरात १११ अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार आहे. या संदर्भातील पत्र आमदारांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. तसेच, ६१ लाख मास्कचेसुद्धा वाटप केले जाणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

पटोले म्हणाले की, “दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. देशातील तरुणाईची ताकद जगाला दाखवून देण्याचा त्यांचा संकल्प होता. २०व्या शतकातच भारताला २१व्या शतकाचे स्वप्न त्यांनी दाखवले. आजच्या डिजिटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली होती. विरोधी पक्षांनी खोटे आरोप करून या नेत्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली. आधुनिक भारताची पायाभरणी करणारे राजीव गांधी हे देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी प्राणाचे बलिदान दिले.”

ही बातमी पण वाचा : आता १४ जूनपर्यंत ‘शिवभोजन थाळी’ मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button