शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट; राष्ट्रवादीची तक्रार

Maharashtra Today

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम(Cyber Crime) विभागाकडे अशा युजर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर, कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेख यांनी दिला.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्यामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. जी आमच्यासाठी तसेच साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले. समाजातील असा कोणताही घटक नसेल, ज्यातून साहेबांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत. मला जसा अनुभव आला, तसाच अनुभव आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनादेखील आला.” असे शेख यांनी सांगितले.

“हे काळजीचे जसे फोन येत होते, मेसेजेस येत होते, त्यांच्याविरोधात अनेक विकृत मंडळी शरद पवारांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हीन दर्जाच्या पोस्ट्सही सोशल मीडियावर पोस्ट करत होते. काहींनी तर शरद पवार यांच्या मृत्यूची आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.” असा संताप मेहबूब शेख यांनी व्यक्त केली.

“शरद पवारांविरोधात विकृत लिखाण”
“या पोस्ट्स पाहून शरद पवारांना मानणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार केली. गेली ५० वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमचा मान, स्वाभिमान असणाऱ्या साहेबांवर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती. परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडवण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही मुंबई येथे शरद पवारांविरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांविरोधात सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन कलम १५३अ, ५०५(२), ५००, ५०४, ४६९, ४९९, ५०७, ३५, आयटी कलम ६६(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.” अशी माहीती शेख यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button