पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन नाराजीनाट्य, अधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Uddhav Thackeray - Sanjay Pande - Maharastra Today

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. वाझे प्रकरणामुळे सरकारची होत असलेली बदनामी टाळण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यातील पोलीस दलात मोठे बदल केले. मात्र या बदल्यांवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारसमोर एक नवा पेच उभा ठाकला आहे. पोलीस दलातील या तडकाफडकी ‘अदलाबदली’मुळे वरिष्ठ अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) खूपच नाराज झाले आहेत. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले.

या बदलीमुळे संजय पांडे चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आतादेखील पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली. तसेच या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले आहे.

परमबीर सिंह नाराज, पदभार न स्वीकारताच सुट्टीवर…

परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र ते होम गार्डच्या मुख्यालयात आलेच नाहीत. ते मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER