बिहारमध्ये नाराजीनाट्य? सुशीलकुमार मोदींचे सूचक ट्विट

पाटणा : मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपा नेतृत्वात बदल होण्याचे संकेत आहेत. भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची निवड झाल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदासाठीचे नाव अद्याप निश्चित झाले नाही, असे नीतीश कुमार म्हणालेत.

नंतर सुशीलकुमार मोदी यांनी – माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही, असे ट्विट केल्याने भाजपात नाराजीची चर्चा सुरू झाली. मोदी ट्विटमध्ये म्हणाले – भाजपा तसेच संघ परिवाराने मला ४० वर्षांच्या राजकीय जीवनात इतकं दिलं आहे जे इतर कोणाला मिळालं नसेल. यापुढेही जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नीतीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नीतीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात गेलेत. नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले – “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजपामधून कोणी तरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होतो आहे.”

बिहारचे उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत काहीही कळलेले नाही. सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार, अशी माहिती नीतीश कुमार यांनी दिली. नीतीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER