मध्य प्रदेश, राजस्थाननंतर दिल्ली कॉंग्रेसमध्येही खदखद

Congress

नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच आता दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष खदखदत असल्याचे समोर आले आहे. पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत. माजी खासदार तसेच काही माजी मंत्री योग्य संधी आणि वेळेची वाट पाहत आहेत. तर दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते पुढच्या काही काळात काँग्रेसचा हात सोडून अन्य कुठल्याही पक्षात डेरेदाखल होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणने प्रसारित केले आहे.

दिल्लीतील सर्व नामांकित माजी आमदार, मंत्री आणि माजी खासदार आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्याकडून योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त जागरणने दिले आहे.

दिल्लीतील पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी पालिका राजकारणातील काँग्रेसचे बडे नेते आपची वाट धरण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या सुरात सूर मिसळून दिल्ली काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहे.

प्रभावी नेतृत्वाचा अभाव, पक्षामध्ये वरिष्ठांकडून ज्येष्ठ नेत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष, कुणाच्याही तक्रारी किंवा समस्या ऐकून घेतल्या जात नाही अशा कारणास्तव कॉंग्रेसची दाणादाण होत असल्याचे पक्षातून निलंबित असलेले महाबल मिश्रा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER