वाद मिटला : उजनीच्या पाण्यासंदर्भातला आदेश रद्द; जयंत पाटलांची घोषणा

Jayant Patil Maharashtra Today

सोलापूर :- उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यात येणार होते. तो निर्णय मागे घेण्यात आला आहे, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केली.

पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यासाठी देण्याचा निर्णय झाला. परंतु, उजनी धरणाच्या पूर्वी ठरलेल्या पाणी वाटपातील एक थेंबही पाणी इंदापूरसाठी नेण्यात येणार नाही. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेले तर राजकारण सोडून देईन, असे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे अनेकदा म्हणाले होते. मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांसाठी देण्याचा निर्णय होता.

या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यात मोठा विरोध झाला. यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली. आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदामंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणीप्रश्‍नावरून तापल्यानंतर जलसपंदामंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.

सुधारित आदेश काढू
जयंत पाटील आज (मंगळवारी) म्हणालेत, राज्याच्या जलसंपदा विभागाने २२ एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झालेत. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढू.

ही बातमी पण वाचा : पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका? जयंत पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button