ओवेसी आणि जलील यांच्यात वाद; ‘वंचित’ चा आरोप

Dispute between Owaisi and Jalil; Accusations of 'deprivation'

पुणे :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘एमआयएम’मधला वाद आणखी वाढला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ने आरोप केला आहे की, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि खासदार जलील यांच्यातील वादामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत असदुद्दीन ओवेसी जोपर्यंत पक्षाची भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत युती तुटली, असे आम्ही मानत नाही.

वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, विधानसभेसाठी एमआयएमकडून अधिकृतपणे १७ जागांचा प्रस्ताव असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी १०० जागा मागितल्या आणि आघाडीने त्याबाबत निर्णय न कळवल्याने युती तुटल्याचे जाहीर केले आहे. इम्तियाज जलील यांनी ही घोषणा स्वतःच्या लेटरहेडवर केली आहे; पक्षाच्या नाही.  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी याबाबत अजून काहीच बोलले नाही.

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की – आमची युती असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत नाही. त्यामुळे आमच्या युतीबाबत असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका आमच्यासाठी निर्णायक असेल. ओवेसी भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत ‘एमआयएम’सोबत युती कायम आहे.

या सर्व प्रकरणात जलील आणि ओवेसी यांच्यातील अंतर्गत वाद, फूट दिसून येत आहे, अशी टीका पक्षाचे महासचिव सचिन माळी आणि प्रवक्ते संतोष संखद यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत केली.

वंचित, शोषित, अल्पसंख्याकांना त्यांच्या जातीच्या प्रमाणात सत्तेत प्रतिनिधित्व दिले पाहिजे, ही ‘वंचित’ची भूमिका आहे. मात्र, खासदार जलील हे अव्वाच्या सव्वा जागा मागून युतीत फूट पाडण्याचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोप माळी यांनी केला.

दरम्यान, जलील यांनी ‘वंचित’सोबत काडीमोड घेऊन स्वबळावर विधानसभा लढण्याची घोषणा केल्यावर प्रकाश आंबेडकर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते. मात्र, ऐनवेळी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली.  त्यामळे दोन्ही पक्षांमध्ये नेमके कशावरून बिनसले आहे, हे उघड झाले नाही.