आमदार आवडे यांच्या घरावापसीची चर्चा; प्रभारी एच. के. पाटील यांचे सूचक वक्तव्य

Hk Patil & Prakash Awade

कोल्हापूर : इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्या काँग्रेसमधील (Congress) प्रवेशाच्या चर्चेला सोमवारी पुन्हा एकदा बळकटी मिळाली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) हे खासगी कार्यक्रमानिमित्त इचलकरंजी दौऱ्यावर होते. त्यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत चर्चा केली.

या प्रसंगी बोलताना एच. के. पाटील यांनी आवाडे यांच्या पक्षप्रवेशाविषयी म्हणाले, ‘आज मैं घरवापसी के लिए आया नही हूँ. पर घर ही उनका है, वो कभी भी वापस आ सकते है.’ काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या या विधानाने आवाडे काँग्रेस पक्षप्रवेश करणार का ? यावरून चर्चा रंगली आहे. इचलकरंजी येथील खासगी समारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर एच.के. पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील हे नेते त्यांच्यासोबत होते.एच. के. पाटील यांनी आवाडे पितापुत्रासोबत विविध विषयांवर गप्पा मारल्या. शेतकरी आंदोलन ते भारत बंद संदर्भात चर्चा झाली.

यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले, ‘आज मैं घरवापसी के लिए आया नही. पर घर ही उनका है, वे कभी भी घर आ सकते है.’ पत्रकार परिषदेचा समारोप होत असताना पालकमंत्री पाटील यांनी प्रभारी एच. के. पाटील यांच्या विधानाचा संदर्भ घेत, ‘आज आमचे ५० टक्के काम झाले’ असे उद्गार काढले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल  आवाडे, हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील, इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश मोरे, प्रकाश दत्तवाडे, शेखर शहा, स्वप्नील आवाडे, राजू मगदूम उपस्थित होते.

आमदार आवाडे हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यास जिल्ह्यात काँग्रेस आणखी मजबूत होईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात आवाडे कुटुंब हे पहिल्यापासून काँग्रेसशी निगडित आहे. आवाडे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. दरम्यान गेल्या काही  दिवसांत त्यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. महिनाभरात एच. के. पाटील आणि त्यांची दोनदा भेट झाली.

आवाडे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. २०१७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर ताराराणी पक्षाची स्थापना केली होती. ताराराणी पक्षाचे दोन सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. दरम्यान आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना ताराराणी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत असल्याची घोषणा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER