UPA च्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा; अजित पवार म्हणतात…

Ajit Pawar - Sharad Pawar

मुंबई : बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर UPAच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) निवृत्ती घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. मात्र UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. खासदार राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याचीदेखील चर्चा आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोनिया गांधी यांच्यानंतर ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व चर्चांवर अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेब दिल्लीत गेले की, अशा बातम्या येतातच. साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे अनेक नेत्यांशी संबंध आले होते. ते सत्तेत असतानाही आणि विरोधी पक्षात असतानाही. त्यांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. विकासकामाच्या संदर्भात राजकारण न आणता, देशाचे महत्त्वाचे प्रश्न सुटावेत, असा शरद पवार यांनी कायम आग्रह धरला आहे. आता दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन जास्त चिघळू नये, यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेतली. मात्र, त्यांना काँग्रेसनं काय सांगितलं, हे अजून तरी माझ्या कानावर आलं नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

एनडीएच्या विरोधात यूपीएतील घटक पक्ष कायम चर्चा करत असतात, रणनीती ठरवत असतात. मात्र, याबाबत अद्याप तरी माझ्या कानावर आलं नाही.

१२ डिसेंबरला शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. तो शांततेत साजरा करण्याचा आमचा प्रयन्त आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्यानिमित्ताने आम्ही शिबिरं घेत आहोत, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER