आयपीएलच्या सप्टेंबरात आयोजनाची चर्चा पण बीसीसीआयपुढे अडचणी आहेत हजार!

IPL 2021 Match Postponed

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमियर लिग (IPL) चे उर्वरित सामने सप्टेंबरच्या शेवटी शेवटी युएई (UAE) मध्ये खेळविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन आठवडे याचे सामने खेळले जातील आणि त्यात एकाच दिवशी 10 वेळा दोन सामने खेळले जाणार आहेत. 18 सप्टेंबर ते 10 आॕक्टोबर दरम्यान हे सामने होतील असा अंदाज आहे आणि त्यासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेआधीच्या भारताच्या न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिका रद्द केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ सुत्रांनी वृत्तसंस्थांना ही माहिती दिली आहे.

आयपीएल 2021 चे अजुनही 31 सामने बाकी आहेत.भारतात आयपीएलचे सामने सुरू असताना बायोबबलमध्ये असूनही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर 4 मेपासून आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते.

आयपीएलच्या आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) समोर अनंत अडचणी असल्या तरी युएईमध्ये सामने होणार असतील, तर ते बीसीसीआयच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे कारण कोरोनाच्या साथीमुळेच टी-20 विश्वचषक स्पर्धासुध्दा युएईमध्ये स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. आॕक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 16 संघांच्या या स्पर्धेचे नियोजन आहे. तसे झाले तर आयपीएल व टी-20 विश्वचषक लागोपाठ होतील आणि संघाच्या प्रवास व खेळाडूंच्या व्यवस्थेचा ताण बराच कमी होणार आहे परंतु आयपीएलचे 31 आणि विश्वचषक स्पर्धेचे 45 असे एकूण 76 सामने खेळावे लागणार आहेत आणि त्यासाठी दुबई, आबुधाबी आणि शारजा ही तीनच मैदाने युएईत आहेत. त्यामुळे लागोपाठ एवढ्या सामन्यांसाठी ही मैदाने आणि तेथील खेळपट्ट्या व्यवस्थित राहतील, खेळपट्ट्यांमध्ये जान टिकून राहील का असे प्रश्न आहेत.

यामुळे काही सामने ओमानमध्येही खेळवायचा विचार सुरू झाला आहे परंतु त्यासाठी क्वारंटीन नियमांचा अडसर येणार आहे. शिवाय क्वारंटीन नियमांमुळे आयपीएल व टी-20 वर्ल्ड कप, दोन्हीसाठी संघाना पूर्वतयारी व सरावासाठी वेळ देता येईल का, हा प्रश्न आहे.

दुसरीकडे कॕरिबियन प्रिमियर लिग (सीपीएल CPL) चे सामने 28 आॕगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान नियोजित करण्यात आले आहेत आणि सीपीएलमध्ये विंडीज खेळाडूंसह आयपीएलमध्ये खेळणारे बरेच परदेशी खेळाडूसुध्दा व्यस्त असतील. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या विंडीज खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यामुळे ते उपलब्ध होऊ शकणार नाहीत ही आणखीन एक समस्या आहे. सीपीएलने आपले वेळापत्रक बदलले तरच ते शक्य होणार आहे.

वेस्टइंडिजच्या खेळाडूंप्रमाणेच इंग्लंडचेही खेळाडू मोठ्या संख्येने आयपीएलच्या संघांमध्ये आहैत आणि आमच्या खेळाडूंचे प्राधान्य आधी राष्ट्रीय संघ आणि नंतर इतर स्पर्धा असे राहिल असे इंग्लंड क्रिकेट मंडळ (ECB) चे संचालक यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे 18 सप्टेंबरपासून आयपीएल युएईमध्ये खेळायचे असेल तर इंग्लडचे खेळाडू उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. कारण इंग्लंडच्या संघाला त्याच काळात बांगलादेश आणि पाकिस्तानात मालिका खेळायच्या आहेत. न्यूझीलंड संघाचाही सप्टेंबर-आॕक्टोबरमध्ये पाकिस्तान दौरा नियोजीत आहे. अफगणिस्तान- पाकिस्तान मालिकासुध्दा सप्टेंबरमध्ये युएईत खेळली जाणार आहे. या मालिकांमुळे खेळाडू वेगवेगळ्या देशांतून प्रवास करून येतील, तिकडे खेळून येतील. प्रत्येक ठिकाणी बायोबबल असेलच असे नाही…असले तरी त्याचे नियम वेगळे असतील त्यामुळे युएईत हे संघ व खेळाडूंसाठी क्वारंटीनचे नियम काय राहतील यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button