
मुंबई :- महाराष्ट्र भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना गडकरी यांचा या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गडकरी यांनी सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) आणि संध्याकाळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त आमदार, औरंगाबादचे नामांतर अशा अनेक विषयांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरोधात कठोर टीका करत आहेत. अशा स्थितीत नितीन गडकरी यांनी एकाच दिवसात मनोहर जोशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
ही बातमी पण वाचा : अन्वय नाईक यांच्या १९ मालमत्ता करण्यात आल्या उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या नावे ! सोमय्या यांचा आरोप
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार होते. युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या विकासामध्ये नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा होता.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सरांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/LzFqht77uZ
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) January 7, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला