कर्नाटकात भाजपच्या नेतृत्वबदलाची चर्चा

BJP Flags

बेळगाव : कर्नाटकात (Karnataka) भाजपच्या (BJP) नेतृत्वबदलाबाबत पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर याबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. विधानसभा, विधानपरिषद पोटनिवडणूक निकाल व इतर घडामोडींचा विचार करुन डिसेंबरअखेरपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याआधी आपला मुलगा विजयेंद्र यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी येडियुरप्पांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याचे समजते.

विजापूर शहरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ (Basangouda Patil Yatnal) यांनी याआधी अनेकदा मुख्यमंत्री बदलाबाबत जाहीर विधाने केली आहेत. इतर पक्षांतील नेत्यांनीही याबाबत विधाने केली होती. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येडियुरप्पा मंत्रिमंडळ विस्ताराची घाई करत आहेत. त्यासाठी त्यांनी दोनवेळा दिल्ली वारीही केली. पण, त्यांना यश आले नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येडियुराप्पांची भेट टाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पण, त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

विधानसभेच्या दोन जागा आणि विधान परिषदेच्या चार जागांसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली. या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पर्यायी नेतृत्वाबाबत चर्चेला जोर येणार आहे. पोटनिवडणुकीत किमान चार जागांवर विजय मिळाल्यास येडियुराप्पांची स्थान भक्कम होणार आहे. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्यास पर्यायी नेतृत्वाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळल्यानंतर येडियुराप्पांनी सत्ता स्थापन केली. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यासमोर काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. पण, येडियुराप्पा सरकारवर त्यांच्या कुटुंबीयांचा शासकीय क्षेप होत असल्याचा आरोप आहे. कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. कोरोना स्थिती योग्यरित्या हाताळण्यात अपयश आल्याचाही आरोप आहे. यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. याची पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने दखल घेतली आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या कोणत्याही राज्यात 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना मंत्रिपद किंवा मुख्यमंत्रिपद देण्यात आलेले नाही. पण, येडियुराप्पांच्या बाबतीत सवलत देण्यात आली आहे.

येडियुराप्पा लिंगायत समाजाचे प्रभावी नेते आहेत. त्यांनी कर्नाटकात भाजपची संघटना वाढवली. राज्यात मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आहेत. त्यांना हटवण्यात आल्यास पर्यायी नेतृत्व कोण? असा प्रश्न आहे. लिंगायत समाजाचे नेते जगदीश शेट्टर यांना संधी देणे शक्य आहे. पण, याआधी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर पराभव पत्करावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER