संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत मतभिन्नता!

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) आत्महत्येप्रकरणी अडचणीत सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना आता त्यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये यावरून शिवसेनेत (Shiv Sena) मतभिन्नता असल्याची माहिती समोर आली आहे.

राठोड यांच्यावरील आरोपांची व्याप्ती वाढत चालली आहे. ज्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत त्यातील एक  कथित आवाजाचा संबंध त्यांच्याशी जोडला जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्येपूर्वी दोन महिन्यांची गरोदर होती आणि तिचा गर्भपात करण्यात आला होता अशा बातम्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. राठोड हे पूजाच्या आत्महत्येला नऊ दिवस उलटले तरी माध्यमांसमोर वा अन्य कोणासमोरही आलेले नाहीत. त्यांचे असे गायब होण्याने त्यांच्याभोवतीचे संशयाचे धुके वाढत चालले आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आग्रही आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल करण्याची मोठी संधी भाजपला मिळेल. ती मिळू नये आणि शिवसेनेची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि  संबंधित प्रकरणातून त्यांना क्लीन चिट मिळत नाही तोवर त्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे या पर्यायावर शिवसेनेत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चारित्र्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही आरोप झाले होते. एका तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते पण राष्ट्रवादीकडून (NCP) त्यांचा अखेर बचाव केला गेला. मुंडे यांनी पक्षनेतृत्वाकडे राजीनामा देऊ केला होता पण अखेर त्यांच्यावर ती पाळी आली नाही. राष्ट्रवादीकडून जर मुंडेंना अभय दिले जाऊ शकते तर मग आपण संजय राठोड यांचा बचाव का करू नये असे शिवसेनेतील काही नेत्यांचे मत असल्याची माहिती आहे मात्र, बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला पाहिजे असे मतप्रदर्शन पक्षनेतृत्वाकडे केले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मुंडे आणि राठोड यांच्यावरील आरोपांचे स्वरुप भिन्न आहे. राठोड यांचा संबंध एका तरुणीच्या मृत्यूशी जोडला जात आहे. आज त्यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपला शिवसेनेवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची कायमची संधी मिळेल, असा एक तर्कही दिला जात आहे.

राठोड हे बंजारा समाजाचे आहेत. या समाजातील एक आश्वासक नेतृत्व आज त्यांच्या रुपाने शिवसेनेकडे आहे. राठोड यांचा राजीनामा घेतला तर संपूर्ण समाज ठाकरे यांच्यावर नाराज होईल. त्यामुळे चौकशीत तथ्य समोर आल्यानंतर राठोड यांच्याविषयीचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पक्षनेतृत्वाने घ्यावी असा एक तर्क राठोड यांच्या बचावासाठी दिला जात आहे. बंजारा समाजात राठोड यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचेही दिसत आहे. ४९ वर्षीय संजय राठोड हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये त्यांचा आणि खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा परस्पर विरोधी गट आहे. पक्षांतर्गत राजकारण काहीही झाले तरी राठोड यांनी सातत्याने निवडून येत स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले आहे.

आपल्या सहकारी मंत्र्यावर काही गंभीर स्वरुपाचे आरोप होत असताना उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. राठोड यांनी स्वत:बाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपविला असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER