दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतो ‘बाईपण भारी देवा’

Maharashtra Today

नाटक, टीव्ही मालिका किंवा चित्रपट माध्यम असो, मराठी प्रेक्षकांच्या आवडीची नस दिग्दर्शक केदार शिंदेने (Kedar Shinde) अगदी ‘सही’ पकडलेली आहे. सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध ‘संवेदनशील’ विषय उत्तम पद्धतीने केदार त्याच्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आला आहे. आता ३ वर्षांच्या गॅपनंतर केदार शिंदे त्याचा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे त्याच्या या आगामी सिनेमाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडियावर रिलीज करण्यात आले. ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva)अशा वेगळ्या नावामुळे लक्ष वेधून घेणार्‍या या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन.’ या कॅच लाईनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढली आहे.

माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची ही पहिलीच निर्मिती असून माधुरी भोसले या सिनेमाद्वारे मराठी इंडस्ट्रीत निर्मात्या म्हणून पाऊल टाकत आहेत. सिनेनिर्मितीत पहिलेच पाऊल असले तरी टीव्ही, ओटीटी, ब्रॅंडेड कंटेंट, ऑडिओ आदि माध्यमक्षेत्रात स्क्रीनशॉटस् संस्थेने अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सिनेमासह २०२१ मध्ये संस्था अजून काही प्रोजेक्टस घेऊन येणार असल्याचे निर्मात्या माधुरी भोसले यांनी सांगितले.

दिग्दर्शक केदार शिंदेने वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत. त्याच्या सिनेमांचा प्रेक्षक सहकुटुंब आस्वाद घेतात, यामुळे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल अबालवृद्धांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमातील कलाकारांच्या नावांची घोषणा सध्या तरी करण्यात आलेली नसली तरी ती लवकरच केली जाणार आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ही नकारात्मक परिस्थिती काही क्षण तरी विसरायला लावणारे निखळ कौटुंबिक मनोरंजन या सिनेमातून घडणार आहे. हा सिनेमा २८ मे २०२१ रोजी रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER