दिग्दर्शक आनंद एल. रायला झाली कोरोनाची लागण

Aanand L. Rai - Corona Positive

बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकार, दिग्दर्शकांना कोरोनाची लागण होण्याची लाट सुरुच आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर संपूर्ण काळजी घेऊन सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे. तरीही अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर, वरुण, कृती सेनन इत्यादी कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले आणि त्यांनी शूटिंगही पूर्ण केले. आता प्रख्यात दिग्दर्शक आनंद एल रायला (Aanand L. Rai) कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः आनंद एल रायनेच गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला कोरोना (Corona) झाल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे बुधवारीच त्याने त्याच्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

49 वर्षीय आनंद एल रायने बॉलिवुडमध्ये 2007 मध्ये ‘स्ट्रेंजर्स’ सिनेमाचे दिग्दर्शन करून प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने कंगनासोबत ‘तनू वेड्स मनू’, धनुष आणि सोनम कपूरसोबत ‘रांझणा’, कंगनासोबतच ‘तनु वेड्स मनु: रिटर्न्स’ आणि शाहरुख, अनुष्कासोबत ‘झीरो’ हे सिनेमे दिले आहेत. त्यापैकी ‘झीरो’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्या सिनेमाच्या अपयशानंतर जवळ-जवळ दोन वर्षे शाहरुखने नवा सिनेमा साईन केला नव्हता. आता त्याने यशराजच्या ‘पठाण’चे शूटिंग सुरु केले आहे. आनंद एल राय अतंरगी रे सिनेमातून एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. ‘झीरो’च्या अपयशानंतर हा सिनेमा तरी त्याला यश मिळवून देईल का असा प्रश्न बॉलिवुडमध्ये विचारला जात आहे,

आनंद एल रायने आज ट्वीटरवर, आज माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि मी ठीक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याने मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे आले होते त्यांनीही स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे आणि सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. धन्यवाद. अशी माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER