हायकोर्टात ८ जानेवारीपर्यंत प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी

Bombay High Court

मुंबई : प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली प्रकरणांची न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणी यापुढेही सुरुच ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ठरविले आहे. त्यानुसार ‘कोविड-१९’चा प्रकार रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय योजत न्यायालयांमध्ये  प्रकरणांच्या प्रत्यक्ष सुनावणीचे काम येत्या ८ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

गेले सहा महिने उच्च न्यायालयात निवडक व तातडीच्या प्रकरणांची ‘व्हर्च्युअल’ सुनावणी होत होती. न्यायालयाच्या प्रशासनाने २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची पद्धत निश्चित केली व १ डिसेंबरपासून प्रायोगिक स्वरूपात प्रत्यक्ष सुनावणी सुरु केली. वकिलांकडून या निर्णयास संंमिश्र  प्रतिसाद मिळाला. मूळ शाखेवरील ‘बॉम्बे बार असोसिएशन’ने तसेच इतर ५०० हून अधिक वकिलांनी पत्र लिहून प्रत्यक्ष सुनावणीची घाई करू नये, असे सुचविले.

या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून  प्रत्यक्ष सुनावणीचे काम सुरु झाले. महाप्रबंधकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार न्यायाधीशांच्या अनौपचारिक बैठकीत चार दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. खूप गर्दी होण्यासह अन्य कोणत्याही अडचणी न आल्याने अशाच प्रकारे प्रत्यक्ष सुनावणी यापुढेही सुरु ठेवावी, असे न्यायाधीशांचे मत पडले. स्वत: मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता यांनी न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत फेरफटका मारून न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या प्रत्यक्ष सुनावणीच्या कामाची पाहणी केली. त्यांनाही ही सुनावणी सुरळीतपणे सुरु असल्याचे दिसले.

मुख्य न्यायायाधीशांनी वकिलांशी संवाद साधला त्यातही त्यांना वकील प्रत्यक्ष सुनावणीस अनुकूल असल्याचे जाणवले. त्यामुळे सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली प्रत्यक्ष सुनावणी ८ जानेवारीपर्यंत त्याच पद्धतीने सुरु ठेवण्याचे मुख्य न्यायाधीशांनी ठरविले. न्यायालयात एकाच वेळी खूप गर्दी होऊ नये यासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रांसाठी सुानवणीस घ्यायच्या प्रकरणांची स्वतंत्र ‘बोर्ड’ तयार करण्यात येतील. त्यानुसार वकील त्यांच्या प्रकरणाची सुनावणी ठराविक सत्रात ठेवण्याची विनंती करू शकतील, असेही महाप्रबंधकांनी कळविले आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER