दिग्पाल लांजेकर आता तयार करणार ‘शेर शिवराज है’

Digpal Lanjekar to produce Sher Shivraj Hai

मराठी चित्रपटसृष्टीत दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) ऐतिहासिक सिनेमांचा देण्याचा प्रयत्न सुरु केला आणि त्यात तो यशस्वीही झाला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘जंग जौहर’ या सिनेमांची निर्मिती त्याने केली. प्रेक्षकांना त्याचे हे प्रयत्न आवडले. ऐतिहासिक लढाया त्याने खूपच उत्कृष्टपणे मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. दिग्पालने आता आणखी एक नवे शिवधनुष्य हाती घेतले आहे. कवी भूषण यांच्या लेखणीतून उतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीकाव्यातील ‘इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है। तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।’ शेर शिवराज है शब्दाप्रती आकर्षित होऊन दिग्पालने याच नावाने सिनेमा तयार करण्याची योजना आखली आहे. या सिनेमाचा फर्स्ट पोस्टर लुकही त्याने नुकताच रिलीज केला आहे.

दिग्दर्शनाकडे वळल्यापासून दिग्पालने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे जनतेसमोर आणले आहेत. तो स्वतः एक चांगला लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे. शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील बऱ्याच देशांच्या सैन्य दल अभ्यासक्रमांमध्ये अफझलखान वध प्रकरणाचा समावेश असून, यातील शिवरायांच्या रणनीतीचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते. गनिमी काव्याने लढलेल्या या युद्धातील विविध कंगोरे सैनिकांना समजावून सांगितले जातात. दिग्पालने हीच बाब लक्षात घेऊन याच कथेवर सिनेमा बनवण्याचा निर्णय केला आहे.

‘फत्तेशिकस्त’ सिनेमाच्या वेळी मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरसह सैन्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी दिग्पालचा संपर्क आला. शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर करणार आहे, यातील ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पालने या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. आठ चित्रपटांपैकी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले असून, ‘जंगजौहर’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमाबाबत सर्वांनाच खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे.

दिग्पाल ‘शेर शिवराज है’ साठी अभ्यास आणि रिसर्च करीत आहे. अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. दिग्पालने आपल्या सिनेमांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम मानसशास्त्र जाणणारा रणनीतीज्ञ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेच रूप ‘शेर शिवराज है’ या चित्रपटात सादर करण्याचा प्रयत्न दिग्पाल करणार आहे. रयतेसाठी कनवाळू, श्रद्धा असलेला राजा ही जनतेच्या मनातील छत्रपतींची रूपेही प्रामुख्याने या सिनेमाद्वारे समोर येतील. त्याचबरोबर महाराजांचे भौगोलिक ज्ञान किती उत्तम होते हे देखील ‘शेर शिवराज है’ या सिनेमात पहायला मिळेल. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून, लवकरच निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER