कोल्हापूर अंबाबाई मंदिरात सुरक्षेसाठी आता डिजिटल “वॉच”

Kolhapur Ambabai temple

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क करण्यासाठी मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर आता डिजिटल वॉच ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्न व पुढाकारातून केंद्र शासनाने दीड कोटी रुपयांचा दिलेला निधी गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला होता. केंद्र सरकारच्यावतीने आलेल्या दीड कोटी निधीतून येत्या एक महिन्यात १२ स्क्रिन, चार टीव्ही व अत्याधुनिक स्पीकर बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

दहशतवादी कारवाईच्या हिटलिस्टवर अंबाबाई मंदिर असल्यामुळे सुरक्षास्तरावर मंदिरात सतर्क यंत्रणा आहे. नवरात्रोत्सवासह उन्हाळी व हिवाळी सुट्ट्यांमध्ये अंबाबाई मंदिरात पर्यटनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रविवारी आणि शनिवारी सुट्टी च्या दिवशी सुमारे 25 हजार भाविक अंबाबाईचे दर्शन घेतात. मंदिराच्या आहे त्या सुरक्षाव्यवस्थेत भर घालण्यासाठी डिजिटल यंत्रणेची जोड देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात १८ फेब्रुवारी रोजी आयपी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्याचे काम सुरू झाले. यानंतर आता मंदिराच्या पूर्वेकडील सरलष्कर भवनसमोर, विद्यापीठ हायस्कूल गेट, घाटी दरवाजा व महाद्वाररोड या चारही प्रवेशद्वारांवर ध्वनीयंत्रणा बसवण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारच्या विद्युत तारांचे जंजाळ नसलेली ही यंत्रणा अत्यंत अत्याधुनिक असून मंदिराच्या आवारात कोणतीही घटना घडल्यास त्याबाबत एकाच वेळी चारही प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांना संदेश देण्याची व्यवस्था या ध्वनीयंत्रणेमुळे करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूला विद्यापीठ हायस्कूल गेट व पूर्व दरवाजाकडून जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तर घाटी दरवाजाबाहेर एक व देवस्थान कार्यालयाशेजारील सिद्धीविनायक गणपती मंदिराशेजारी एक अशा चार एलईडी वॉल बसवण्यात येणार आहेत. मंदिरात कोणत्याही अनुचित प्रकार घडल्यास सीसीटिव्हीमध्ये चित्रीत होणारे चित्रण या वॉलवरून तत्काळ दिसेल व तातडीने कारवाई होण्यास मदत मिळणार आहे. या व्यतिरिक्त मंदिराच्या आवारात ५० इंच आकाराचे १२ टीव्ही स्क्रीन लावण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.