वेगळी भूमिका वेगळा प्रयोग

Piyush Ranade

बडोद्यातून मुंबईत येऊन कलाकार म्हणून आपली ओळख संपादन करण्यासाठी अभिनयाच्या जोरावर अनेक उत्तम मालिका आणि चित्रपट करणारा अभिनेता पीयूष रानडे (Piyush Ranade). पीयूषचा लवकरच ‘अजुनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयाची आवड जोपासत बडोदा ते मुंबई हा प्रवास अगदी लीलया पार पाडण्यात त्याने उत्तम प्रयत्न केला आहे. ‘काटा रुते कुणाला’, ‘साथ दे तू मला’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला तो आला. अभिनयाच्या सोबतीने संगीताशी त्याचं एक अनोखं नातं आहे. अभिनयात येऊन अनेक दर्जेदार भूमिका केल्या. तो उत्तम नट आहे. अभिनेता म्हणून तो उत्तम अभिनय करतो; पण त्याचं संगीताशी असलेलं नात ऐकू या…

संगीतासोबत अतूट नातं

माझी आतेबहीण, आत्या या दोघी गातात. माझे बाबा सीतारवादक, व्हॅनोलिस्ट आहेत. आजोबा व्हॅनोलिस्ट होते, ते आता हयात नाहीत. मी गाण्याच्या रियाजाला माझ्या आजोबांसमोर बसायचो, गुरु-शिष्य परंपरा असं होतं. आजोबा गायचे नाहीत; पण त्यांना गाण्याची पारख होती. ते मला नेहमी प्रेरित करायचे . मी त्यांच्याकडून शिकलो आहे. शाळेत असताना मी घरी येऊन रियाज करायचो. मी फक्त गात नाही तर तबला, हार्मोनियम , पियानो , सिंथेसायजर वाजवतो . मी दोन वर्षे संगीत शिकलो आहे. घरात हा गाण्याचा आणि वाद्यकलांचा संगम असल्यामुळे मला गायला आवडतं. सध्या रियाजाची जागा बाथरूम आहे. गाणं हा जवळचा विषय आहे. गाण्यावर प्रेम करणारे लोक आवडतात . संगीत ही एक अशी भावना आहे, जी माणसाला जवळ आणू शकते आणि जोडून ठेवते. नाटकात संगीत फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक माणसात कुठे तरी संगीत असायला हवंच .

अभिनयाच्या सोबतीने तो फिटनेसप्रेमीदेखील आहे. फिटनेस फंडा आणि फिटनेसच्या खास गोष्टी सांगताना पीयूष सांगतो, “रोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा आरशासमोर उभं राहून आपल्याला फ्रेश वाटायला हवं . सगळ्यांनी सुंदर दिसायला हवं, फिट राहायलाच हवं, स्वतःवर प्रेम करणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. जेव्हा आपण फिट राहतो तेव्हा फार सुंदर दिसतो. इंडस्ट्रीत एक व्यक्ती आहे जी आजसुद्धा तेवढीच फिट आणि हॅण्डसम दिसते, ते म्हणजे अनिल कपूर. ते अजूनसुद्धा तितकेच तरुण आहेत त्यांचं स्वतःवर प्रेम आहे. आपण स्वतःवर प्रेम करणं शिकायला हवं. स्वतःची काळजी घेणं मग ती शारीरिक असो मानसिक असो आपल्याला या बाबतीत फिट राहणं गरजेचं आहे . आपण कोणाहीसोबत नातं जोडलं तरी जगात सगळ्यात छान नातं आपलं आपल्यासोबतच असतं. हे जेव्हा शक्य होतं जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो . मला फिटनेसचं महत्त्व आहे; कारण मी फक्त या इंडस्ट्रीत आहे म्हणून नाही तर मी एक खेळाडू आहे. म्हणून ही एक फिट राहण्याची सवय आहे. मला धावायला आवडतं. मला याचं कौतुक आहे . मी सध्या जिमला जातो. कार्डिओला मी मैदानात जातो तिथे वर्क आऊट करतो . जेव्हा वजनाचा व्यायाम असतो तेव्हा मी कामावरून येऊन रात्री जिमला जातो . मी फिटनेसच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करत नाही, करू शकत नाही. फिटनेससाठी लोक कंटाळा करतात, आपण स्वतःपुरता अर्धा तास तरी काढायला हवा. दिवसभरात आपण अनेक वेळा फोनवर असतो. यातून वेळ काढून आपण फिट राहण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. प्रत्येक कलाकाराने निरोगी राहायला हवं. मराठीत अगदीच कमी सहकलाकार फिटनेस बाबतीत वेळ काढतात. स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन स्वतःच्या बुद्धीचीदेखील काळजी घेतली जाते. वर्क आऊट केलं की मनाला मिळणारं समाधान काही वेगळंच असतं. जर मी काही नाही केलं तर मला बेचैन व्हायला होतं. फिट राहिलो, व्यायाम केला तर फायदा आपल्याला आहे; आपण निरोगी राहतो, आपली त्वचा छान राहते, मानसिक, शारीरिक संतुलन बरोबर राहतं. चांगलं खाणं आणि नियमित वर्कआऊट करणं या बाबतीत मी शिस्तबद्ध आहे. ”

अभिनयात विविध भूमिका बजावून फिटनेसची आवड जपत आता नव्या चित्रपटात त्याची एक खास भूमिका बघायला मिळणार आहे. पीयूषला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER