पुरुष व महिला क्रिकेटमधील हे अंतर कोण व कसे दूर करणार?

Maharashtra Today

महिलांचे क्रिकेट (Women’s Cricket) आणि पुरुषांचे क्रिकेट (Men’s Cricket) याची तुलना होऊ शकत नाही. दोघांत जमिन- अस्मानाचा फरक आहे हे मान्य आहे. पुरुषांच्या क्रिकेटसारखा पैसा व लोकप्रियता महिला क्रिकेटला नाही हेसुध्दा मान्य आहे पण पुरुषांच्या ‘सी’ ग्रेड खेळाडूला मिळणाऱ्या रकमेच्या निम्मेच रक्कम महिला क्रिकेटच्या टॉपच्या खेळाडूला मिळावी एवढाही फरक निश्चितच नाही आणि असेल तर त्याची जबाबदारी कुणाची, याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे कारण महिला क्रिकेटचे घर हे पूर्वीसारखे वेगळे राहिलेले नाही तर ते आता एकाच छताखाली आले आहे आणि ते छत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) आहे पण जसे एका कुटुंबात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करु नये असे म्हणतात आणि तो भेद बऱ्यापैकी कमीसुध्दा झाला आहे. आता तेच बीसीसीआयला सांगायची वेळ आली आहे कारण उदाहरणे भरपूर आहेत.

ताजे उदाहरण बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना दिलेल्या वार्षिक कराराचे (Annual Contract) आहे. पुरुषांमध्ये करार हे अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि एक कोटी रुपयांचे दिले जातात. महिला क्रिकेटसाठी कराराच्या तीनच श्रेणी असून त्याची रक्कम अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 10 लाख रुपये आहे.

याच्याआधीची उदाहरणे बघायची तर पुरुष क्रिकेटपटूंच्या कोरोना चाचण्यांसाठी खास सोय, खास काळजी आणि महिला क्रिकेटपटूंना मात्र तुमची चाचणी तुम्ही स्वतःच करुन घ्या आणि रिपोर्ट सोबत बाळगा अशा सूचना, इंग्लंडला जाण्यासाठी पुरुष संघाला चार्टर्ड विमानसेवा आणि महिला संघाला मात्र साधारण विमानाने प्रवासाची सूचना अशा वावड्या उगाचच उठत नाहीत. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.

एखादी महिला क्रिकेटपटू आई-बहिणीला कायमची मुकते पण तिच्या सांत्वनासाठी बाहेरच्या क्रिकेटपटूने आवाज उठवल्यावरच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना वेळ मिळतो, दुःखात असलेल्या या क्रिकेटपटूला संघातून वगळण्यात येते पण तिला कळविण्याचे सौजन्य नाही, याचवेळी दुसरी एक महिला क्रिकेटपटू मात्र आईला कायमची गमावल्यावरसुध्दा दुसऱ्याच दिवशी संघासोबत बबलमध्ये दाखल होते, ज्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल गंभीर आक्षेप आणि त्यातून त्याची हकालपट्टी झालेली पण त्याचीच पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती असे पोषक(?) वातावरण असते.

वर्ल्ड टेस्ट चॕम्पियनशीपचा (World Test Champion) अंतिम सामना 18 जूनला सुरू होणार असताना संघ बऱ्याच आधी जाहीर केला जातो आणि 16 तारखेला सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी महिलांचा संघ मात्र नंतर जाहीर होतो, पुरुष संघाचे वार्षिक करार एप्रिलच्या मध्यातच जाहिर केले जातात आणि महिलांचे करार मात्र महिनाभर उशिराने आणि तेसुध्दा दीड वर्षानंतर जाहीर केले जातात, एकीकडे एकाच वेळी पुरुषांच्या दोन- दोन संघांचे कार्यक्रम आखले जात आहेत पण महिलांना वर्ष-वर्षभर सामना खेळायला मिळत नाही, सात वर्षानंतर कसोटी सामना, दीड वर्षानंतर वन डे सामने आणि वर्षभरानंतर टी-20 सामना अशी ज्यांना संधी दिली जाते असा भेदाभेद स्पष्ट दिसतो तिथे वार्षिक करारात समानता बाळगण्याची अपेक्षाच व्यर्थ आहे.

सतत सामने खेळत राहणाऱ्या आणि खोऱ्याने पैसे ओढून आणणाऱ्या आणि त्यायोगे बीसीसीआयला क्रिकेट जगतात सुपर पाॕवर बनवणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंना झुकते माप देण्यात काहीच गैर नाही पण महिलांनाही त्यांच्या मापाचे ते मिळावे, काटा मारुन त्यांची फसवणूक केली जाऊ नये अशी अपेक्षा बाळगणेही काही चुकीचे नाही.

शेवटी महिला क्रिकेटपटूंना किती संधी द्यायची, कुठे खेळवायचे कुठे नाही हे ठरविणारे मंडळ आहे, महिला फारशा खेळत नाहीत त्यामुळे त्यांना बरोबरीने कमाई कशी होणार हा दावा समर्थनीय नाही. कारण त्याचे सामने, मालिका रद्द होत असतील तर त्या खेळाडू करत नाहीत.

महिला क्रिकेट संघ मंडळाचा खजिना भरत नसेल तर त्याची व्यावसायिकता वाढविण्याची, मार्केटींग करण्याची जबाबदारी मंडळाचीच आहे. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच त्याचे मार्गसुध्दा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढले पाहिजे. दुर्देवाने आपण जिंकणार नाही, यशस्वी ठरणार नाही तोवर अधिक मानधन मागू नये अशा विचाराच्या काही महिला खेळाडू आहेत पण पुरुष संघसुध्दा नेहमीच यशस्वी ठरलाय असे झालेले नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आणि महिला क्रिकेटलाही योग्य मार्केटींग केले तर लोक येतात हे गेल्यावर्षीच्या आॕस्ट्रेलियातील विश्वचषक अंतिम सामन्याने दाखवून दिलेले आहे.

बीसीसीआयने जे ताजे वार्षिक करार महिला क्रिकेटपटूंना दिले आहेत त्यातील खेळाडूंची संख्या 22 वरुन 19 अशी घटवली आहे. पुरुषांमध्ये बीसीसीआयने 28 खेळाडूंना करार दिलेला आहे.
शेफाली वर्मा व पूनम राऊत यांना ‘ब’ श्रेणीत बढती देण्यात आली आहे. रिचा घोष हिला तिसऱ्या श्रेणीचा करार मिळाला आहे तर अलीकडेच आई आणि बहिणीला गमावलेल्या वेदा कृष्णमूर्तीसह एकता बिश्त, डी हेमलता व अनुजा पाटील यांना करारच देण्यात आलेला नाही.

कसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारचे सामने खेळणाऱ्या हरमनप्रित कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांना वार्षिक 50 लाखांचा ‘अ’ श्रेणिचा करार देण्यात आला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंतचे हे करार आहेत.

पुरुष व महिला क्रिकेट करार

श्रेणी—– पुरुष — महिला (रक्कम लाखात)
ए प्लस– 700 — श्रेणी नाही
ए ——– 500 — 50
बी ——- 300 — 30
सी ——- 100 — 10

महिला क्रिकेटपटूंचे करार..

अ श्रेणी – 50 लाख रुपये
हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव

ब श्रेणी – 30 लाख रुपये
मिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा राॕड्रिग्ज

क श्रेणी- 10 लाख रुपये
मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल,प्रिया पुनिया आणि रिचा घोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button