
नवी दिल्ली : आजच्या ताज्या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी (Diesel price hike) स्तरावर पोहचले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली.पेट्रोल (Petrole) दरात २३ पैशांनी करण्यात आलेल्या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर ८४.२० रुपयांवर पोहचले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर २६ पैशांनी वाढून ७४.३८ रुपयांवर गेले आहेत. मागील १० महिन्यांत डिझेल दरात १४ रुपयांची वाढ झाली. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ५४ डॉलर्स प्रतिबॅरलवर गेले आहेत.
याच्या परिणामी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ सुरू केली आहे. सुमारे महिनाभर दर स्थिर ठेवल्यानंतर बुधवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल दरात वाढ केली होती. यानंतर गुरुवारी पुन्हा इंधन दरात वाढ करण्यात आली. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर वाढून ९०.८३ रुपयांवर गेले असून डिझेलचे दर ८१.०७ रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेले आहेत. याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ८४ रुपये प्रतिलिटरवर गेले होते. त्याच दिवशी दिल्लीत डिझेलचे दर ७५.४५ रुपये प्रतिलिटरवर गेले होते. दिल्लीत डिझेल दराचा आतापर्यंतचा उच्चांक ८१.९४ रुपयांचा असून हा दर ३० जुलै २०२० रोजी गाठला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला