‘काय तुमचा अभ्यास… अजून तुम्ही झोपला होता का’; विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर संतापले

Vijay Wadettiwar

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र येथे त्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात कृषी विभागाचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्यामुळे वडेट्टीवार आक्रमक झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.

या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक उपस्थितीत होते. कृषी विभागाकडून झालेल्या ३० टक्के पंचनामे आणि कामात होणारी दिरंगाई या मुद्यावर विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर आक्रमक झाले. ‘काय तुमचा अभ्यास… अजून तुम्ही झोपला होता का? कृषी विभागाने बागायदार आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसू नयेत. युद्ध पातळीवर काम करा. तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे लवकर करावेत. इतर ठिकाणाहून मनुष्यबळ मागवावे. संरक्षण बंधारे बांधले नाहीत, तर भविष्यात गावांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी संबंधित विभागाने सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

“शेतीचे आणि फळबागांचे पंचनामेही सुरू आहेत. ते ही लवकरच पूर्ण होतील. कोकणवासियांना भरीव मदत केली जाईल. कोणालाही नाराज न करता सढळ हाताने कशी मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. संरक्षण बंधारे बांधण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावली जाईल. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.” असे आश्वासन यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button