जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होते का? दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

CM-Uddhav-Thackeray-Pravin-Darekar

मुंबई : चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकताच दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र केवळ तीन तासांच्या या दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. कोकणात वादळ चार तास थांबले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, अशा चिमटा घेणाऱ्या शब्दांचा वापर करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीका केली. तौक्ते वादळाचा मोठा फटका पालघर जिल्ह्यालाही बसला आहे.

या वादळामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या ट्रकला रवाना करण्यात आले. यावेळी त्यांनी ही टीका केली. दरेकर म्हणाले, मी खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासहित रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस ७०० किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये भेट देत नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बागायतदारांशी चर्चा केली. त्यांचं  दु:ख जाणून घेत मदत करण्याचे आश्वासनही आम्ही त्यांना दिले.

परंतु मुख्यमंत्री तीन ताससुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत. यावरून सरकारच्या जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहेत हे त्यांच्या कृतीवरून दिसून येते. तसेच वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. वादळ चार  तास थांबले होते. परंतु मुख्यमंत्री केवळ तीन ताससुद्धा थांबू शकले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणारा ठरला. मुख्यमंत्री कोकणात आले नसते तरी चालले असते. कोकणात दौरा करून पुन्हा मुंबईत येण्यापेक्षा मंत्रालयात किंवा वर्षा निवास येथे बैठक घेता आली असती. यामुळे कोकणवासीयांना दिलासा तरी देता आला असता.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी तत्काळ पंचनामे होतील, असा दावा केला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरीदेखील पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री पंचनामे झाल्यावर मदत जाहीर करू, असे आश्वासन देतात. पंचनाम्याच्या नावाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस फोटो काढण्यासाठी कोकणचा दौरा करतात या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचाही दरेकर यांनी समाचार घेतला. तुम्ही कोकणात येऊन एका फोटोसाठी तीन दिवस शासनाची यंत्रणा कामाला का लावली? मुख्यमंत्री कोकणात येणार म्हणून येथील सर्व अधिकारी-कर्मचारी तीन-चार दिवस कामावर होते.

तुम्ही जर एका फोटोसाठी कोकणात आला नसता तर त्या तीन-चार दिवसांत अधिकाऱ्यांनी कोकणवासीयांना काही तरी दिलासा दिला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवास करतात आणि आम्ही जमिनीवरून दौरा करतो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्री स्वत: खासगी विमान घेऊन रत्नागिरीला आले होते. त्यांनी विमानतळावर बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच; परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन माहितीसुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्यांना विमानतळावर बोलावून बैठक घेतली.

बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले. अधिकाऱ्यांना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले. स्वतः विमानाने दौरा करायचा आणि पंतप्रधानांच्या हवाई दौऱ्यावर टीका करायची ही कोणती पद्धत आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्री जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होते का? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button