नाओमी ओसाकाचे चुकले काय? टेनिस जगताने तिला एकटे पाडले का?

naomi osaka - MAharashtra Today

नाही…मला बोलायची इच्छा नाही…प्लीज, मला एकटे राहू द्या…अशी कुणी विनंती केली तर आपण त्याला डिस्टर्ब करतो का? त्याच्या इच्छेनुसार त्या व्यक्तीला एकटे राहू देतो ना! त्याच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करतो ना! जगातील दुसऱ्या क्रमांकाची जपानी टेनिसपटू नाओमी ओसाकासुद्धा (Naomi Osaka) हेच तर सांगत होती; पण केवढा गहजब झाला.

तिच्या म्हणण्याचा वेगळाच अर्थ काढला गेला. तिला माध्यमांशी बोलायचे नाही आणि ती टाळाटाळ करतेय असा गैरसमज करून तिच्या पत्रकार परिषदा न करण्याच्या निर्णयाला विनाकारणच प्रतिष्ठेचा मुद्दा केला गेला आणि सारे टेनिस (Tennis) जगत एका बाजूला आणि ओसाका एका बाजूला असे चित्र निर्माण केले गेले. तिला दंड केला गेला. धमकावले गेले आणि शेवटी चार ग्रँड स्लॅम स्पर्धांची विजेती असलेल्या या खेळाडूला फ्रेंच ओपनमधून (French Open) दुसऱ्या फेरीआधीच माघार घेण्यास भाग पाडले गेले. मात्र या साऱ्या प्रकरणातून काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ह्या प्रश्नांचे काय?
प्रेक्षक टेनिसच्या स्पर्धांत खेळ बघायला जातात की पत्रकार परिषदांत खेळाडू काय बोलतात हे ऐकायला? टेनिसपटूंची इच्छा असो वा नसो, सामन्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलायलाच हवे ही सक्ती कशासाठी…ही बाब ऐच्छिक का नाही? आणि विजेत्या खेळाडूचे ठीक आहे, पण पराभूत खेळाडूलाही पत्रकार परिषदेची सक्ती कशासाठी? आणि घ्यायचीच असेल तर सामना संपल्या संपल्या मैदानावरच प्रतिक्रिया घ्यायची तशी काही सेकंदांची बातचीत का नसावी? सामन्यानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये खेळाडूंची इच्छा नसताना लंबीचौडी पत्रकार परिषद कशासाठी? आणि टेनिस सोडून इतर दुसऱ्या कोणत्या खेळात असे होते का? आणि ज्या फ्रेंच ओपनच्या आयोजकांनी ओसाकाच्या माघारीची घोषणा करणारी पत्रकार परिषद घेतली त्यात पत्रकारांचा एकही प्रश्न त्यांनी का घेतला नाही? खेळाडूंनी पत्रकारांना सामोरे जायचे तर पदाधिकाऱ्यांनी का जायचे नाही?

ओसाका एकटी का पडली?
एवढे सर्व मुद्दे जर ओसाकाच्या बाजूने आहेत तर टेनिसचे खेळाडू तिच्या पाठीशी का उभे राहिले नाहीत, असा प्रश्न पडणे साहजिक आहे; पण स्पर्धात्मक व्यावसायिकतेची ही किंमत ते चुकवत आहेत. त्यांचीसुद्धा कदाचित ओसाकासारखीच इच्छा असू शकते पण त्यांना ओसाकाचे जे झाले तेच आपले होईल अशी भीती असावी. त्यांना हे माहिती आहे की, त्यांना मिळणारी भरघोस रकमेची बक्षिसे आणि जगभर लोकप्रियता, त्या लोकप्रियतेतून मिळणाऱ्या जाहिराती व करार हे माध्यमांच्या माध्यमातूनच येत असतात आणि त्यामुळे माध्यमांना नाराज करून चालणार नाही म्हणून ते माध्यमांचे गोडवे गाताहेत आणि माध्यमांनी त्यांना प्रकाशात आणले नसते तर ही जी लोकप्रियता त्यांना व खेळाला मिळाली आहे ती मिळालीच नसती असा दावा नदालसह आघाडीचे सर्व खेळाडू करताहेत.

झ्वेरेव्हने आगीत तेल कसे ओतले?
तो दावा नक्कीच निराधार नाही; पण प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात. ओसाकाचा अपवाद केला तर इतर खेळाडूही अशीच भाषा करतील म्हणून हे एक प्रकारचे बंडच मानून एटीपी, डब्ल्यूटीए, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांच्या आयोजकांनी ते बंडच ठेचून काढायचा चंग बांधला आणि ओसाकाला एकटे पाडले गेले. त्यात अलेक्झांडर झ्वेरेवसारख्या खेळाडूने ‘नाओमी ओसाकाने पत्रकार परिषदा नाही केल्या तर चालते मग मी नाणेफेकीला उशिरा आलो तर काय फरक पडतो’ असे विधान करून आगीत तेलच ओतण्याचे काम केले.

प्रातिष्ठेचा मुद्दा कुणी बनवला?
या प्रकरणात ओसाकाची पत्रकारांना सामोरे न जाण्याची भूमिका चुकीची ठरवली गेली पण माध्यमांची, पत्रकारांची भूमिका काय आहे हे समोर आलेच नाही. ज्या माध्यमांशी बोलायलाच हवे हा अट्टहास धरला गेला त्या माध्यमांना ओसाका किंवा इतर खेळाडू, ज्यांची बोलायची इच्छा नाही ते नाही बोलले तर चालेल की नाही या विषयावर चर्चाच झाली नाही. फक्त व्यावसायिक टेनिसचे नियंत्रण करणाऱ्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी ATP) आणि वुमेन्स टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए WTA) यांच्या करारात ही अट आहे, व्यावसायिक खेळाडू म्हणून करार करताना प्रत्येक टेनिसपटूला त्याची माहिती असते म्हणून त्याचा आदर करायलाच हवा, असा अट्टहास करत प्रतिष्ठेचा मुद्दा केला गेला.

ओसाकाचा लढाऊ बाणा विसरलात का?
आणि गंमत म्हणजे जी नाओमी ओसाका पत्रकारांशी बोलण्यास तयार नाही म्हणून रान उठवले गेले ती स्पष्टवक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांत ब्लॅक लाईव्हज मॅटर (Black Lives Matter) चळवळीसह तिने मानवी हक्कांसंदर्भात जेवढ्या प्रखरपणे आवाज उठवलाय तशी भूमिका घेण्याची दुसऱ्या कोणत्याही टेनिसपटूची हिंमत झालेली नाही. आणि डब्ल्यूटीएच्या अटीनुसार आतापर्यंत ती सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदा करतच आली आहे. पहिल्यांदाच तिने नकार दिला आणि तसे करताना आपली भूमिकासुद्धा मांडली आणि या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याची तयारीसुद्धा दाखवली; पण संघटनांनी नाही…तुला बोलावेच लागेल अशी भूमिका घेतली.

काय म्हणणे होते ओसाकाचे?
वास्तविक नाओमी ओसाका काय असे चुकीचे बोलली होती? ती खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलच बोलली होती. ती म्हणाली होती, ‘मी जेव्हा पत्रकार परिषदांना उपस्थित असते किंवा त्यात भाग घेत असते त्या त्यावेळी मला जाणवते की लोकांना खेळाडूंच्या मनस्थितीबद्दल काहीच देणेघेणे नसते. बऱ्याचदा आम्हाला तेच प्रश्न विचारले जातात ते आधी किती तरी वेळा विचारलेले असतात. आमच्याबद्दल शंका निर्माण करणारे प्रश्न विचारले जातात; पण आता मी माझ्याबद्दलच शंका घेणाऱ्या लोकांना संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पराभवानंतर किती तरी वेळा मी पत्रकार परिषदांमध्ये खेळाडूंचा धीर सुटल्याने त्यांना रडताना बघितलेले आहे. एखादी व्यक्ती नैराश्यात असताना, उदास असताना तिचे मनोबल अधिकच खच्ची करण्याचा हा प्रकार असतो आणि म्हणूनच या पत्रकार परिषदा कशासाठी ते मला कळत नाही. या जुनाट पद्धतीत बदल गरजेचा आहे. तो बदल कसा करता येईल यासंबंधी मी या स्पर्धेनंतर वुमेन्स टेनिस असोसिएशन टूर (WTA Tour) आणि टेनिसच्या नियंत्रण संस्थांशी चर्चा करणार आहे. दुर्दैवाने हे रोलँड गॕरोसच्या वेळी होतेय हा निव्वळ योगायोग आहे.

आता ओसाकाच्या या म्हणण्यात चुकीचे काय, ते न कळण्यासारखे आहे. तिच्या या भूमिकेवर ड्ब्ल्यूटीए व फ्रेंच ओपन आयोजकांनी आम्ही खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याला सर्वोच्च प्राधान्य देतो आणि त्याकडे लक्ष देतो असे एकीकडे म्हटले तर दुसरीकडे तिला दंड केला आणि स्पर्धांमधून बाद करण्याची धमकीसुद्धा दिली. या त्यांच्या कृतीतूनच ते खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याकडे कसे व किती लक्ष देतात यातील विरोधाभास दिसून आला.

वैयक्तिक बाबीही कराव्या लागल्या उघड
त्यांच्या खेळाडूंच्या काळजी घेण्याच्या या कृतीपायीच ओसाकाला माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना आपल्या त्या गोष्टी ज्या जगासमोर मांडायच्या नव्हत्या त्या मांडाव्या लागल्या. ओसाकाने माघारीची घोषणा करताना म्हटलेय, “मी काही दिवसांपूर्वी माझे विचार पोस्ट करताना अशी परिस्थिती येईल किंवा यावी याचा विचारसुद्धा केलेला नव्हता. आता या स्पर्धेसाठी, इतर खेळाडूंसाठी आणि माझ्या भल्यासाठी या स्पर्धेतून माघार घेणे हेच हिताचे आहे. इतरांसाठी अडथळा ठरू नये असाच माझा प्रयत्न असतो. मला येथे हे मान्य करायला हवे की, माझी वेळ चुकली आणि माझा आधीचा संदेश स्पष्ट नव्हता. मी मानसिक स्वास्थ्याला कधीच कमी लेखलेले नाही किंवा सहजतेने घेतलेले नाही. वस्तुस्थिती ही आहे की, २०१८ च्या यूएस ओपनपासून मला मधूनमधून नैराश्य (depression) येत असते आणि त्याचा सामना करणे मला फार अवघड जाते. मला जे जाणतात त्यांना माहीत आहे की, मी मितभाषी आहे, स्पर्धांच्या ठिकाणीसुद्धा मी हेडफोन वापरताना दिसून येते; कारण त्याच्याने मला अस्वस्थता, बेचैनी कमी होण्यास मदत होते. टेनिसच्या पत्रकारांचे नेहमीच मला सहकार्य लाभले आहे (आणि ज्या पत्रकारांना माझ्या विधानांनी वाईट वाटले असेल त्यांची मी माफी मागते). मी चांगली सहज व्यक्ती नाही. त्यामुळे मीडियाला सामोरे जाताना माझ्यावर दडपण असते, तणाव येतो आणि तुम्हाला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यास मला अडचणी येतात. म्हणून पॕरिसमध्ये मी स्वतःला असुरक्षित समजत होते, चिंतित होते, म्हणून स्वतःची काळजी म्हणून मी स्वतःला पत्रकार परिषदांपासून लांब ठेवणार होते. मी त्याची आगावू घोषणा यासाठी केली की, काही नियम कालबाह्य झालेले आहेत आणि त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. मी स्पर्धा आयोजकांना खासगीत लिहून याबद्दल दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे आणि स्पर्धेनंतर त्यांच्याशी या विषयावर चर्चा करायची तयारीसुद्धा मी दाखवली आहे. म्हणून मी आता काही काळ मैदानापासून लांब जात आहे. पण योग्य वेळी डब्ल्यूटीए टूरसोबत खेळाडू, प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांसाठी आणखी चांगले काय करता येईल यावर काम करण्यास मी तयार आहे.”

नाओमीच्या बहिणीने काय सांगितले?
ओसाकाची ही बाजू समजल्यावर पत्रकार परिषदांना उपस्थित न राहण्याचा तिचा निर्णय चुकीचा होता असे म्हणता येईल का? नाओमी ओसाकाची बहीण मारी ओसाका (Mari Osaka) हिनेसुद्धा तिची मानसिक स्थिती तणावाची असाल्याचे नमूद करणारी एक पोस्ट टाकली आहे. त्यात ती क्ले कोर्टवर यशस्वी होऊ शकत नाही अशी टीका तिच्यावर काही निकटवर्तीयांनी केली होती. पत्रकार परिषदांमध्येही तिची क्ले कोर्टवरची कामगिरी चांगली नसल्याचे दाखले देण्यात येतात. अशातच रोम येथील स्पर्धेत पहिल्या फेरीतच हरल्यावर तिलासुद्धा असेच वाटू लागले होते म्हणून तिने स्वतःला इतरांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. फ्रेंच ओपनमध्ये यशासाठी हाच पहिला उपाय तिला वाटला होता म्हणून ती अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होती; पण त्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे मारी ओसाकाने म्हटले आहे.

कोण बोलले ओसाकाच्या बाजूने?
या पार्श्वभूमीवर नाओमी ओसाकाने सुरुवातीलाच आपल्या नैराश्याची मन:स्थिती व बेचैनीच्या विकाराचा उल्लेख केला असता तर तिला सहानुभूती मिळाली असती असे आता काहींना वाटतेय; पण सेरेना विल्यम्स, लिंडसी डेव्हेनपोर्ट या टेनिसपटू व दिना अॕशर स्मिथसारखी आॕलिम्पिक अॕथलीट यांनी नाओमीची बाजू घेतली आहे.

दिना अॕशर स्मिथने (Dina Asher Smith) म्हटलेय की, एखादी व्यक्ती आपले मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला साथ दिली पाहिजे. खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यायलाच हवे; कारण शेवटी आम्हीसुद्धा माणसेच आहोत.

सेरेना विल्यम्सने (Serena Williams) म्हटलेय की, मला नाओमीसाठी वाईट वाटतेय. तिला कवटाळावे असे वाटतेय. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि वेगवेगळ्या गोष्टी हाताळण्याची त्यांची शैली वेगळी असते, ती जे काही चांगले करता येईल स्वतःसाठी ते करण्याचा प्रयत्न करतेय.

लिंडसे डेव्हेनपोर्ट (Lindsay Devenport) हिने म्हटलेय की, अशाच ताणतणाव व दबावांनी जेनिफर कॕप्रियातीसारखी चांगली खेळाडू लवकरच संपली होती म्हणून खेळाडूंच्या मन:स्वास्थ्याची फार काळजी घ्यायला हवी.

धोनीचे उदाहरण का आठवले?
या साऱ्या पार्श्वभूमीवर क्रिकेटमधील किती तरी खेळाडू हे मैदानाबाहेर कुठेच दिसत नाहीत हे आठवल्याशिवाय राहात नाही. सर्वांत उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीचे ( M.S. Dhoni) आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर प्रदीर्घ काळ त्याने स्वतःला एकदम अलिप्त ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दल आणि त्याच्या निवृत्तीबद्दल नाना प्रकारच्या चर्चा झाल्या; पण धोनी चकार शब्दसुद्धा बोलत नव्हता. आपल्या निवृत्तीची घोषणासुद्धा त्याने पत्रकार परिषद वगैरे न घेता सोशल मीडियावरच केली होती. त्यामुळे टेनिसमध्येच खेळाडूंना पत्रकार परिषदांचा एवढा आग्रह का, आणि नाओमी ओसाकाच्या बाबतीत तो प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून एका आघाडीच्या विजेत्या खेळाडूला कसे खेळण्यापासून वंचित ठेवण्यात आले तो प्रकार दुर्दैवी आहे. परंतु एकूण स्थिती पाहता त्यात बदल होईल अशी चिन्हे कमीच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button