हॉकी कर्णधार मनप्रीतने विवाहासाठी धर्मांतर केलेय का?

Manpreet Singh - Illie Saddique

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार (Indian Hockey Captain Manpreet Singh) मनप्रीतसिंगचा मलेशियन (Malaysia) तरुणी इली सादिकशी (Illie Saddique) विवाह कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. ही जोडी गेल्या बुधवारी विवाहबध्द झाली. मलेशियात 2012 मध्ये मनप्रीत सुल्तान जोहोर कप (Sultan Johor Cup) स्पर्धेत खेळायला गेला होता तेंव्हा त्याची या तरुणीशी ओळख झाली होती. या दोघांचा पंजाबमधील जालंधर नजिकच्या मिथापूर येथील गुरुद्वारात विवाह झाला.

यासंदर्भात मलेशियातील एका मंत्र्याने म्हटले आहे की ही तरुणी अजुनही मुस्लीमच आहे. ती मलेशियात परतली की तिला चौकशीसाठी बोलवण्यात येईल असे मलेशियातील धार्मिक व्यवहार अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मलेशियातील पंतप्रधान कार्यालयातील धार्मिक विभागाचे उपमंत्री अहमद मार्झुक शारी म्हणाले की, इली नाजवा अनोर हुसीन सादिक आणि मनप्रीतसिंग यांच्या विवाहासंदर्भात जोहोर इस्लामिक धार्मिक विभागाकडून अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार ती तरुणी अजुनही मुस्लीम आहे कारण तिच्या धर्मांतराबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारचा अर्ज मिळालेला नाही. परदेशात विवाहबध्द होणार असल्याबद्दलही तिने कळविलेले नाही. सोशल मीडियावर प्राप्त माहितीनुसार इली ही अद्यापही मुस्लीमच आहे आणि मनप्रीतने गेल्यावर्षी इस्लाम धर्म स्वीकारला आहे मात्र यासंदर्भात स्वतः इलीशी बोलल्याशिवाय खात्रीने काहीच सांगता येणार नाही, असे अहमद मार्झूक यांनी म्हटले आहे. रविवारी मासेमार व शेतकऱ्यांना मदत वाटप केल्यानंतर ते बोलत होते.

इली ही मलेशियातील आणखी एक मंत्री दातुक हलिमा मोहम्मद सादिक यांची पुतणी आहे. तिच्या शिख रितीरिवाजानुसार विवाहानंतर मलेशियात वादळ उठले आहे. रविवारीच हलिमा यांनी इलीच्या वतीने एक निवेदन जारी केले. त्यात ती अजुनही मुस्लीम असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात म्हटलेय की, ‘मी माझ्या आणि मनप्रीतच्या अज्ञानाबद्दल माफी मागते. मनप्रीतने गेल्यावर्षीच इस्लाम धर्म स्विकारला आहे. मी माझे नाव किंवा धर्म बदललेला नाही. माझे नाव अजुनही इली नाजवा अनूर हुसेन सादिक असेच आहे. मनप्रीतच्या कुटुंबाला माझे नाव उच्चारणे अवघड जात होते म्हणून ते मला 2012 पासून नवप्रीत संबोधतात. 16 डिसेंबरलाच आम्ही निकाह केला होता पण तो आम्ही लपवून ठेवला. त्याचे प्रमाणपत्र पुढील बुधवारी मिळेल.

ती म्हणते की भारतातील प्रसिध्दि माध्यमानी त्यांच्या विवाहाचे व्हिडीओ व्हायरल केल्यापासून स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या विवाहासाठी प्रवासाकरिता आपण रितसर सर्व प्रक्रिया पार पाडून आलो आहोत आणि मंत्र्याची पुतणी असल्याचा कोणताही गैरफायदा घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER