
रत्नागिरी : कोरोना बाधित मृतदेहाचे अंत्यविधी संदर्भात रत्नागिरी शहरात झालेल्या विरोधामुळे दोन मृतदेह चिपळूण व देवरुख येथे पाठवण्यात आले. अशा मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करावेत याबाबत १५ मार्च २०२० रोजी शासनाने परिपत्रक काढले आहे. यामध्ये मृतदेह विलगीकरण कक्षातून जवळच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी हस्तांतरित करावा असे नमूद करण्यात आले आहे. असे असताना रत्नागिरी शहरात दोन स्मशानभूमी असताना केवळ चार दोन नागरिकांच्या विरोधामुळे हे मृतदेह सुमारे ९० किलोमीटर दूर अंत्यविधीसाठी कसे काय पाठवले याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
चारदोन लोकांच्या अत्यंत चुकीच्या विरोधापुढे प्रशासन का झुकले? लोकांचे चुकीचे समज व भीती दूर करून शासकीय नियमानुसार अंत्यविधी करण्यास प्रशासन सक्षम नाही का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. चिपळूण येथे जो मृतदेह पाठवण्यात आला होता त्या शववाहिनीवरील चालकाला तब्बल २ तास पीपीई घालून ड्रायव्हिंग केल्याने चक्कर आल्याची देखील माहिती मिळत आहे. एका चुकीच्या घटनेमुळे संसर्गजन्य रोगातील मृतांच्या अंत्यविधीबाबत एखादा नवीन पायंडा पडू शकतो याची दखल प्रशासनाने घेणे आवश्यक आहे असे मत काही सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला