सीएमना कात्रजचा घाट दिसू लागलाय का?

Uddhav Thackeray & Sharad Pawar

Shailendra Paranjapeपुलापर्यंत पोचल्यानंतरच तो ओलांडण्याचा आम्ही विचार करतो, अशा आशयाचं एक इंग्रजी वचन प्रसिद्ध आहे. या वचनातला विचारही तसा योग्यच म्हणायला हवा; कारण आम्ही हे करू, आम्ही ते करू असं कोणी म्हणू लागलं तर त्या व्यक्तीची ती क्षमता नसली तर त्या वक्तव्यांना गमजा असंच म्हणावं लागतं. तसंच काहीसं कालपरवा घडलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना विधानसभेवर एकहाती भगवा फडकवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. माननीय मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. मुळात आपल्या तीनचाकी रिक्षा-सरकारचं आयुष्य किती, याविषयी स्वतः उद्धव ठाकरेच साशंक आहेत. त्यामुळेच अधूनमधून हिंमत असली तर दाखवा पाडून आमचं सरकार, असं आव्हान ते त्यांचे पूर्वाश्रमीचे युतीतले भागीदार असलेल्या भारतीय जनता पक्षाला देत असतात.

आपलं सरकार कार्यकाळ पूर्ण करूच शकणार नाही, याबद्दलच ठाकरे यांना खात्री आहे की काय, अशी शंका येते. म्हणूनच तर ठाकरे यांच्या विधानसभेवर एकहाती भगवा फडकावण्याच्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खास पुणेरी शैलीतली टिप्पणी केलीय. गेली तीस वर्षे एकहाती भगवा फडकवण्याच्या गोष्टी आम्ही ऐकतोय, अशा शब्दांत पवार यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याची टिंगल केलीय. एक प्रकारे एकहाती भगवा फडकावणे केवळ स्वप्नरंजन आहे, असंच भासवण्याचा पवार यांचा हेतू दिसतो.

कोरोना (Corona) काळात विशेषतः पहिल्या लॉकडाऊनच्या एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईतच नव्हे तर पुण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व नावालाही दिसलं नाही. मुंबई-पुण्यासह मोठी शहरं नोकरशाहीच्या हाती सोपवून कोरोना स्थिती सरकारनं राम भरोसेच सोडली होती.

असं असताना आणि अजून मुख्यमंत्रिपदाचे एक वर्षही पूर्ण केलेले नसताना मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेवर एकहाती भगवा फडकावण्याची भाषा का बरे करत असावेत, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या फेसबुकवरच्या भाषणांमुळे पुरेसे ट्रोल झालेत; पण त्यांना राजकीय नेता म्हणून रिडिक्यूल करणं किंवा कमी लेखणं भल्याभल्यांना महागात जाऊ शकतं. ठाकरे यांना हे पक्कं माहीत आहे की आपलं सरकार पडलंच तर ते कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच पाडतील. कारण १०५ आमदारांनिशी भाजपा सरकार स्थापनेचा दावा करूच शकत नाही आणि ठाकरे सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा विचारही करू शकत नाही.

म्हणूनच मग ठाकरे जेव्हा विधानसभेची भाषा करू लागतात तेव्हा पहाटे झालेल्या शपथविधीसारखंच अर्ध्या रात्रीत दगाफटका होणार आहे की काय, अशी शंका वाटते. त्यात मुळात सरकारचा भक्कम आधार आहेत ते राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक भरवशाचे आणि कुणीही खांद्यावर मान द्यावी, असे शरद पवार. त्यामुळे तर ठाकरे यांनी हे विधान केलेले नाही ना?

दगाफटक्याचा वास ठाकरे यांना आला तर ते फारच मुरब्बी राजकीय नेते असल्याचं मान्य करावं लागेल; कारण एखाद्याला कात्रजचा घाट दाखवण्याचं कसब पवारसाहेबांकडे आहे, हे भल्याभल्यांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. मग ते माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी असोत की लातूरचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख… आणि ही गोष्ट स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीतही असेल आणि एव्हाना लक्षातही आली असेल. म्हणून तर त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना विधानसभेवर एकहाती भगवा फडकवण्याची तयारी सुरू करा, असे सांगितले नसेल ना?

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER