कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळ जिल्ह्यात : संजय राठोड

Sanjay rathod
  • वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआरडीएल लॅबचे उद्घाटन
  • एमआरआय मशीनही लवकरच कार्यान्वित होणार

यवतमाळ : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे. या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा उपचाराबाबत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र कोणत्याही रोगाच्या योग्य उपचारासाठी त्याचे निदान त्वरीत होणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोरोनाचे नमुने तपासणीकरीता आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो. मात्र नमुने तपासणीच्या अत्याधुनिक मशीन वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्यामुळे कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळातच होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. टी.सी.राठोड आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अडचणींचा सामना करून अखेर ही प्रयोगशाळा यवतमाळात सुरू करता आली, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटनेचे आपण साक्षीदार आहोत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत विदेशातून मशीन आणणे, विविध स्तरावर परवानगी घेणे, हे सर्व जोखमीचे काम होते. त्यातच या मशीन सिंगापूरला अडकल्या. त्यामुळे ही प्रयोगशाळा यवतमाळ येथे सुरू होणार की नाही, याबद्दल मनात शंका निर्माण होत होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणेने आलेल्या अडचणींवर मात करून हे शक्य करून दाखविले. यासाठी संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुरुवातीला दुबई, मरकज आणि आता मुंबई-पुणे येथून आलेल्या लोकांमुळे वाढली आहे. या बाधित असलेल्या लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविल्यानंतर रिपोर्ट यायला उशीर लागत होता. त्यामुळे सदर लोक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळत नव्हते. यादरम्यान पॉझिटिव्ह असलेले लोक कुठे कुठे फिरले असेल, किती लोकांच्या संपर्कात आले असतील, याचा अंदाजच लागत नव्हता. मात्र आता कोरोनाची लक्षणे असलेले नमुने इतरत्र पाठविण्याची गरज नाही. तसेच त्याचे निदान यवतमाळ येथे होणार असल्याने उपचार मिळण्यास मदत होईल. केवळ कोविडचे नमुनेच नाही तर या प्रयोगशाळेत सर्व साथींच्या रोगांचे तसेच एचआयव्ही, चिकनगुनीया, डेंग्यू आदींचे नमुने तपासणी करून निदान करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अतिशय चांगले आहे. आरोग्य विभागामुळे सर्वांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कोरोना विरुद्धच्या या युद्धात सर्वांनी प्रशंसनीय काम केले असले तरी ही लढाई संपली नाही. सर्व योद्धे व नागरिकांच्या सहकार्याने ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासन आणि प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच यवतमाळला मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉपकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांचे त्यांनी आभार मानले.

तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एमआरआय मशीन आणि त्याकरीता बांधण्यात येणाऱ्या सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात एमआरआय मशीनकरीता शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्व सुविधांनी उपयुक्त असलेली ही इमारत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, तबलिगी लोकांचे नमुने १ एप्रिलला तपासणीकरीता पाठविले मात्र त्याचा रिपोर्ट ८ एप्रिलला प्राप्त झाला. हे रिपोर्ट एक-दोन दिवसातच मिळाले असते तर एवढा संसर्ग झाला नसता. आठ दिवसाच्या विलंबामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला. येथे प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी खनीज विकास निधीतून ३.५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. प्रयोगशाळा जरी कार्यान्वित झाली असली तरी जास्त कोरोनाबाधित रुग्ण येऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रयोगशाळेविषयी माहिती देताना डॉ. गुजर म्हणाले, ही प्रयोगशाळा मायक्रोबॉयलॉजी विभागांतर्गत कार्यान्वित राहणार आहे. वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी १३ मशीनचा एक संपूर्ण सेट आहे. २४ तासात जवळपास १२५ ते १५० चाचण्या करता येऊ शकतात. येथे कार्यरत डॉक्टर आणि स्टाफचे नमुन्यांच्या निदानाबाबत नागपूर एम्स येथे प्रशिक्षण झाले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह यांनी तर आभार डॉ. गुजर यांनी मानले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, डॉ. हिवरकर, डॉ. बाबा येलके, डॉ. गवार्ले, डॉ. धकाते, डॉ. विजय डोंबाळे, आदी उपस्थित होते.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER