मधुमेह – आहार काय घ्यावा ?

Diabetes

रक्त तपासणीमधे साखरेचे प्रमाण वाढले की काय खाऊ नये याची एक मोठी यादीच तयार होते. हे खा ते खाऊ नको असा सल्ला प्रत्येक व्यक्तीकडून मिळतो. योग्य तज्ज्ञांचा सल्ला न घेता वॉट्सअप व गुगल वाचून ज्ञानी झालेले “तज्ज्ञ” आपल्या शरीराला त्रासदायक स्थितीत आणून ठेवतात. मधुमेहाकरीता औषधी सेवनासोबतच योग्य आहार विहार आखून त्यावर अंमलबजावणी करणे खूप आवश्यक आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तींमधे २ प्रकार आढळतात. कृश मधुमेही आणि स्थूल मधुमेही. दोघांची प्रकृती वेगळी मग आहार सर्वच मधुमेहींना सारखा कसा चालेल ? बारीक शरीरयष्टी असणाऱ्याला आहार पौष्टीकच आहार द्यावा लागेल पण मधुमेह न वाढविणारा. परंतु स्थूल व्यक्तीला मधुमेह असेल तर स्थूलता कमी करणारा वजन कमी करणारा आहार योग्य ठरेल बरोबर ना! हे वैशिष्ट्य आहे आपल्या शास्त्राचे आयुर्वेदाचे! व्यक्तिपरत्वे आहार नियोजन.

लठ्ठपणा आणि मधुमेह यांचे मुख्य कारण काय तर मुळीच व्यायाम न करणे, एका जागी बसून राहणे, मऊ गादीवर बराच वेळ राहणे, अधिक झोप, पचायला जड गोड जास्त स्नेहयुक्त आहार घेणे अशी अनेक कारणे आहेत त्यामुळे व्यायाम करणे हा दिनचर्येतला बदल अतिशय महत्त्वाचा ठरतो.

“यव” हा धान्य प्रकार सर्वात श्रेष्ठ सांगितला आहे. पुरी, सातूचे पीठ, बाटी, दलिया या कोणत्याही प्रकारात यवाचा प्रयोग खूप फायदेशीर आहे. कारण नवीन गहू तांदूळ हे दोन्ही मधुर आणि कफ वाढविणारे असल्याने वजन कमी करण्यात मदत करीत नाही. या रुग्णांमधे यव (जौ) अतिशय उपयुक्त आहे.

मूग, साठेसाळी तांदूळ, गहू कडधान्य ( १ वर्ष जुने) यांचे पदार्थ सूप, लवकर पचणाऱ्या हलक्या स्वरूपात घेऊ शकतात. उदा. खीर हलवा लाडू हा मूगाचा जड पदार्थ त्यामुळे वजन व मधुमेह वाढविणारा आहे पण मूगाचे कढण, सूप, तांदूळ मूगाची पातळ खिचडी हलकी सुपाच्य आहे. धान्य तेच पोषक तत्त्व तिच पण घेण्याची पद्धत बदलली त्यामुळे त्रासदायक न होता शरीराला पोषकच.

  • भात हा जुन्या तांदूळाचा व कुकरमधे न शिजविता घ्यावा. (“भात कसा शिजवावा” या लेखात वाचावे.)
  • कवठ, जांभूळ हे फळं मधुमेह कमी करणारे आहेत. ज्या ऋतुमधे उपलब्ध होतात तेव्हा नक्की खावी.
  • कडू रसाच्या भाज्या उदा. कारले मेथी घेणे.
  • मध हे उत्तम कफनाशक स्थौल्य कमी करणारे व मधुमेह कमी करणारे आहे. म्हणून मध पाणी घेणे फायदेशीर ठरते. फक्त मध गरम कधीच करू नये हे लक्षात ठेवावे.
  • त्रिफळा उत्तम स्थौल्यहर व मधुमेह कमी करणारे आहे. त्रिफळा काढ्यात रात्रभर यव भिजवून ठेवावे सकाळी गाळून स्वच्छ कपड्यावर वाळवावे. भरड (जाडसर) दळून सत्तू प्रमाणे बनवावे त्यात थोडे मध टाकून घ्यावे. हा उत्तम नाश्ता मधुमेहीकरीता होऊ शकतो.
  • मधल्या वेळेत खाण्याकरीता राजगिरा साळीच्या ज्वारीच्या लाह्या ( चुरमुरे नाही) फायदेशीर आहे.
  • खाखरा (मेथीचा) सुद्धा घ्यायला हरकत नाही.
  • आवळा उत्तम रसायन असल्यामुळे ताज्या आवळ्याचा रस, आवळा रसात थोडी हळद व मध टाकून घेणे उपाशीपोटी घेणे फायदेशीर आहे.
  • सरसो तेलाचा वापर करावा.
  • औषधे, पंचकर्म चिकित्सा याकरीता तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा. इतर काही त्रास असतील तर त्यानुसार आहार नियोजन बदलते.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER