धुळे महापालिका निवडणुकीत : ईव्हीएम हॅक करण्याच्या नावाखाली लुबाडले?

धुळे:  धुळे महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली जामनेरातील दोघांनी ६५ लाख रूपये लुबाडल्याची चर्चा मंगळवारी जामनेरमध्ये होती.
धुळे मनपात पराभूत झालेल्या उमेदवारांनी सोमवारी जामनेरवारी करून काही स्थानीक पदाधिकारी, कार्यकत्र्यांची भेट घेऊन हा विषय कानी टाकला. तर याबाबतचे मोबाईलवरील रेकॉर्डंग असलेले संभाषणही अनेकांनी ऐकल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली.

धुळे महापालिका निवडणूकीत ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय नक्की करतो असे सांगून जामनेरातील दोघांनी धुळे येथील चार उमेदवारांकडून तब्बल ६५ लाख रूपये घेतले. यात एका बांधकाम ठेकेदारासह जामनेरातील मुळ रहिवासी असलेल्या व सध्या धुळे मनपाच्या शाळेतील एका शिक्षकाचे नाव चर्चेत आहे.

निवडणूक होऊन निकाल जाहीर झाले, त्यात संबंधित चारही उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे पराभुतांनी कार्यकर्त्यांसह जामनेर गाठले. येथे मोहल्यातील एका दुकानात सोमवारी रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. यात काही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून घेतलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन प्रकरणावर पडदा टाकला अशी चर्चा मंगळवारी दिवसभर शहरात होती. या प्रकाराबाबत मंगळवारी धुळे येथूनही काही राजकीय मंडळींचे जामनेरातील पदाधिकाऱ्यांना दिवसभर फोन सुरू होते.

धुळे येथील पराभूत उमेदवाराचे भाऊ जामनेर येथे पैसे वसूलीसाठी आले होते. त्यांची येथील कार्यकर्त्यांशी वसुलीवरून बाचाबाची झाली व त्यांच्याविरूध्द जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाल्याच्या चर्चेचे जामनेरात पेव फुटले. मात्र एकंदारत या प्रकाराबाबत जामनेर पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहीती पोलीस सुत्रांनी दिली.