धुळे हत्याकांड : मुख्य आरोपी विक्की पोलिसांच्या अटकेत

धुळे : शहरात १८ जुलै रोजी गुड्ड्या उर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल झाले होते.पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यन्त ५ जणांना अटक केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी फरार असल्याने पोलिसांवर खूपच दबाव वाढला होता. मात्र या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविताच हत्याकांडचा मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. विक्की उर्फ विकास श्याम गोयर असे आरोपीचे नाव असून, त्याला सटाणा तालुक्यातील मिताने येथून अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी गुड्ड्याच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. . तसेच, सध्या या हत्याकांडामधील गोयर गॅंगचा मुख्य सूत्रधार बडा पापा उर्फ विजय गोयर आणि श्यामभाऊ जोगीलाल गोयर हे दोघेही अद्यापही फरार आहे.

यापूर्वी पोलिसांनी हत्येत सहभागी असलेला आरोपी भीमा देवरे आणि योगेश जगताप यांना दोंडाईचा परिसरातून, गणेश पिवलला मध्यप्रदेशातील खांडवा येथून तर राजा भद्राचा भाऊ दादू देवरे याला अटक करण्यात आली असून,२२ जुलै रोजी सागर साहेबराव पवार या प्रमुख आरोपीला कामशेतमधून पकडण्यात आले होते.

धुळे शहरात १८ जुलै रोजी पहाटे गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख या कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गोयर आणि देवरे गँगने टोळी युद्धातून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.