धोनीचे समर्थक म्हणतात, नेट रनरेटही महत्त्वाचा! नाराज म्हणतात, कुठे तरी प्रॉब्लेम आहे

शारजात (Sharjah) राजस्थानविरुध्दच्या (Rajsthan) सामन्यात ‘दि ग्रेट फिनीशर’ म्हणून नावलौकिक कमावलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या (M. S. Dhoni) फलंदाजीच्या पध्दतीवर मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विजयासाठी 16 पेक्षा अधिकच्या धावगतीने धावा हव्या असताना त्याने 12 चेंडूत 9 धावा केल्या आणि अखेरच्या षटकात सामना हातातून गेल्यावर त्याने लागोपाठ तीन षटकार मारुन त्याने काय दाखवण्याचा प्रयत्न केला असा सवाल केला जात आहे.

धोनीचे समर्थक म्हणतात की धोनीचे हे तीन षटकार म्हणजे गोलंदाजांना इशाराच होता. शिवाय त्यांचे असेही म्हणणे आहे की, सामना जिंकू शकत नसलो तरी चेन्नई सुपर किंगचा (CSK) किमान नेट रनरेट तरी चांगला राखावा अशी भूमिका असावी कारण प्ले ऑफसाठी पात्र ठरताना नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दोनशेच्यावर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत विजयासाठी प्रयत्न करण्यात दीडशे धावात बाद होण्यापेक्षा पराभवाचे अंतर कमी ठेऊन नेट रनरेटही चांगला ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे धोनीने शेवटी शेवटी का होईना, धावा वाढवल्या आणि त्याने फक्त खराब चेंडूच फटकावले. तसे चेंडू मिळायची तो वाट बघत होता असा धोनी समर्थकांचा दावा आहे.

मात्र धोनीवर नाराज असलेल्यांचे म्हणणे आहे की आपण अजुनही पाहिजे तेंव्हा षटकार मारु शकतो हे धोनीने दाखवून दिले हे ठीक आहे पण त्याने हे षटकार थोडे आधीच मारले असते तर काय बिघडले असते? धोनीचा काय सिध्द करण्याचा प्रयत्न होता? कॉमन सेन्स सांगतो,की धोनीने लवकर प्रयत्न करायला हवा होता. 6 चेंडूत 38 धावा हव्या असताना आपण षटकार मारु शकतो हे दाखविणे काय कामाचे?

नेट रनरेटच्या मुद्द्यावरही नाराज क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, स्पर्धेच्या सुरुवाती- सुरुवातीलाच नेट रनरेटचा तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच कुठेतरी प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतेय का की संघाला नेट रनरेटचा आधार घ्यावा लागेल? त्यापेक्षा आक्रमक खेळ करुन जिंकायचा प्रयत्न का करु नये? सामन्यातून मिळू शकणारे पूर्ण गूण का घेऊ नयेत?

दरम्यान आयपीएलमध्ये धोनी अपयशी पाठलागात पाचव्यांदा नाबाद राहिला. हे पाच डाव असे…

63 वि. मुंबई इंडियन्स, 2013 (फायनल)
42 वि. किंग्ज इलेव्हन, 2014 (क्वालिफायर)
79-वि. किंग्ज इलेव्हन, 2018
84- वि. रॉयल चॕलेंजर्स, 2019
29- वि. राजस्थान रॉयल्स, 2020

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद

धोनी वि. मुंबई इंडियन्स- 11 वेळा
धोनी वि. कोलकाता नाईट रायडर्स- 11 वेळा
धोनी वि. किंग्ज इलेव्हन- 11 वेळा
धोनी वि. राजस्थान रॉयल्स- 10 वेळा
जडेजा वि. कोलाकाता नाईट रायडर्स- 10 वेळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER