धोनीचा चेन्नईसाठी एकच सामना ज्यात तो दुसऱ्याच्या नेतृत्वात खेळला

MS Dhoni - CSK

महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावावर आयपीएलमधील (IPL) असंख्य विक्रम आहेत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सुरुवातीपासून आतापर्यंत तोच कर्णधार आहे. चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वाशिवाय कधी खेळलाय असे आठवतसुध्दा नाही पण असे घडलेय आणि फक्त एकदाच घडलेय. इतक्या वर्षात फक्त एकदाच धोनी दुसऱ्या कुणाच्या नेतृत्वाखाली चेन्नईसाठी खेळलाय. हे आश्चर्य कधी व कसे घडले ते नंतर पण त्याच्याआधीची महत्वाची बातमी ही की, महेंद्रसिंग धोनीने आता चेन्नई सुपर किंग्जसाठी 200 सामने खेळले आहेत आणि यापैकी 199 सामन्यात तो सुपर किंग्जचा कर्णधार आहे.

या 200 सामन्यांपैकी आयपीएलमधील सामने आहेत 176 आणि चॕम्पियन्स लीगमधील सामने आहेत 24. एकाच संघासाठी धोनीपेक्षा अधिक सामने खेळलेला एकच खेळाडू आहे तो म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) . विराटने राॕयल चॕलेंजर्स बंगलोरसाठी 209 सामने खेळले आहेत.

आता तो एक सामना ज्यात धोनी सुपर किंग्जचा कर्णधार नव्हता. तो सामना होता 2012 च्या चॕम्पियन्स लीगचा (Champions League) याॕर्कशायरविरूध्दचा. ह्या सामन्यासाठी सुपर किंग्जचा कर्णधार होता सुरेश रैना (Suresh Raina) आणि त्याच्या नेतृत्वाखाली धोनी त्या सामन्यात खेळला होता.

रैनाकडे नेतृत्व कसे आले तर त्या चॕम्पियन्स लीगमध्ये सीएसकेचा तो शेवटचा सामना होता आणि त्याच्याआधीच त्यांचे आव्हान संपलेले होते. म्हणून धोनीने त्या सामन्यात यष्टीरक्षणही केले नव्हते आणि नेतृत्वाची धूरासुध्दा रैनाकडे सोपवली होती. विशेष म्हणजे त्या सामन्यात धोनीने गोलंदाजीसुध्दा केली होती. त्याने दोनच षटके टाकली होती. त्यातील दुसरे षटक अतिशय महागडे ठरले होते.

याप्रकारे आजतागायत चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनी फक्त एकच सामना इतर कुणाच्या नेतृत्वात खेळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button