४३६ दिवसांनंतर परतला तरीही धोनीच्या कप्तानीचीच चर्चा !

Mahendra Singh Dhoni

‘जिथे विजय तिथे धोनी’ हे समीकरण महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) तब्बल ४३६ दिवसांनंतर मैदानात उतरला तरी कायम राहिले. त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएलच्या (IPL) १३ व्या सत्राला विजयी सुरुवात करताना मुंबई इंडियन्सला (MI) चार चेंडू आणि पाच गडी राखून मात दिली.५८ धावांवर नाबाद राहिलेल्या फाफ डू प्लेसिसने (FAF DU PLESSIS) विजयी धाव केली तेव्हा खेळपट्टीवर दुसऱ्या टोकाला नाबाद होता. आपल्या संघाच्या आणखी एका विजयी अभियानाचा तो साक्षीदार होता

यावर लगेच कॉमेंटही आल्या. हरभजन नसू दे, रैना नसू दे, कोरोनाच्या संकटाने खळबळ असू दे… काय फरक पडतोय… तीन गोष्टी कायम आहेत… सूर्य दररोज उगवतोय, सीएसकेचा संघ जिंकतोय आणि धोनी विजयाचा साक्षीदार आहे.

नेहमीप्रमाणेच या सामन्यातसुद्धा  नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्यापासून ते सॕम करनला आपल्या आधी फलंदाजीला पाठवेपर्यंत ‘माही’च्या नेतृत्वाचीच चर्चा होती. दव महत्त्वाची भूमिका पार पडेल, फिरकीपटू प्रभावी ठरतील आणि तडाखेबाज सॕम करन बाजी पलटवेल हे त्याचे आडाखे खरे ठरले.

याबद्दल धोनी म्हणतो की, तिनशेवर वन डे सामन्यांचा अनुभव असेल तर तो अशा वेळी कामी येतोच. रवींद्र जडेजा व सॕम
करनला फलंदाजीत दिलेली बढती हा तर प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दडपण आणण्याचा एक भाग होता.

अंबाती रायुडू ७१ धावा केल्यावर आणि फाफ डू प्लेसिससोबत ११५ धावांची भागीदारी केल्यावर बाद झाला तेव्हा चेन्नईला विजयासाठी २४ चेंडूंत ४२ धावांची गरज होती. अशा वेळी पाचव्या क्रमांकावर एकतर केदार जाधव किंवा धोनी स्वतः फलंदाजीला येईल असा अंदाज होता; पण डाव्या- उजव्या  फलंदाजाच्या कॉम्बिनेशनसाठी धोनीने रवींद्र जडेजाला पाठवून मुंबईला गोंधळात टाकले. जडेजाने चार चेंडूंतच १० धावा केल्या; पण तो फार टिकला नाही. तो बाद झाला तेव्हा १७ चेंडूंत २९ धावा असे समीकरण होते. यावेळीसुद्धा धोनी अपेक्षित असताना सॕम करन बॕट घेऊन मैदानात दिसला आणि सॕमने दोन षटकार व एक चौकार लगावून चेन्नईवरील दडपण बरेच कमी केले. हे धोनीचे डावपेच चर्चेचा विषय आहेत.

कधीतरी मला असे वाटले होते की जडेजा आणि करनसारख्या खेळाडूंना त्यांच्या बॕटीची करामत दाखवायची संधी द्यायला हवी. त्यांचे दोन फिरकी गोलंदाज अजून शिल्लक होते आणि गोलंदाजांना चिडवण्याचा, भडकवण्याचा तो मानसिक भाग होता. आमची फलंदाजी सखोल आहे त्यामुळे त्यांनी गोलंदाजांवर हल्ला चढवणे अपेक्षितच होते. एक दोन षटकार लागले तर नंतरचे काम सोपे होणार होते असे धोनीने या निर्णयांबद्दल म्हटले आहे. स्वतः सॕम करनलाही या बढतीचे आश्चर्य वाटले होते. धोनी ‘जिनीयस’ आहे असे वर्णन करताना तो म्हणाला की, मला पाठवताना त्याने नक्कीच काही विचार केलेला असणार, बहुधा लेफ्ट- राईट काॕम्बिनेशन! . 18 वे षटक आम्ही टारगेट करणारच होतो आणि आम्ही धोका पत्करुन ते केले.

अबुधाबीच्या वातावरणात परिस्थितीनुरुप गोलंदाजी महत्त्वाची ठरणार होती म्हणून धोनीने संघबांधणीच तशी केली. ड्वेन ब्राव्हो खेळू शकणार नाही म्हणून करन आला, इम्रान ताहीरऐवजी एन्गिडीला पसंती देण्यात आली आणि पियुष चावला प्रभावी ठरला. एन्गिडीने आपल्या नंतरच्या दोन षटकात फक्त 9 धावा देत मुंबईचे तीन गडी बाद केले ते पाहता धोनीचा निर्णय किती योग्य होता ते दिसुन येते. तो म्हणतो की, पहिल्या डावात चेंडू फारसा स्विंग होणार नाही हे उघडच होते म्हणून काहीशी आखूड टप्प्याची गोलंदाजी योग्य ठरणार होती. पण दुसऱ्या सत्रात चेंडू स्विंग होणार होता.

सीएसकेच्या या विजयाने त्यांची मुंबईविरुध्दच्या सलग पाच पराभवांची मालिका तर खंडीत केलीच शिवाय मुंबईच्या सलामी सामन्यातील पराभवाची मालिका आठ सामन्यांपर्यंत वाढवली. शिवाय अबुधाबीत सहा सामन्यानंतरही त्यांची विजयाची प्रतीक्षा कायम ठेवली.

अंदाज होता त्याप्रमाणे मुंबईची फलंदाजी कमकुवत असल्याचे दिसुन आले. टॉप आॕर्डर वगळता खाली फारसा दम नाही हे सिध्द झाले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेसुध्दा हे मान्य केले. रायुडू व डूप्लेसिस ज्यापध्दतीने टिकून खेळले तसे आमच्या फलंदाजांना जमले नाही. आम्हाला 15 ते 20 धावा कमी पडल्या असे तो म्हणतो. फक्त फटकेबाजीच नाही तर एक-दोन धावासुध्दा महत्वाच्या आहेत हे आमच्या फलंदाजांनी लक्षात घ्यायला हवे असे रोहीत म्हणतो. मुंबईने अखेरच्या 6 षटकात 6 गडी गमावले आणि शेवटच्या 32 चेंडूत त्यांना फक्त 38 धावा जमवता आल्या या अनुषंगाने मुंबई च्या कर्णधाराचे हे विधान होते.

ह्या बातम्या पण वाचा : 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER