धोनी म्हणतो, 15 ते 20 धावा कमी पडल्या, पंत म्हणतो, आवेश व टॉमने चिंता मिटवली

Maharashtra Today

दिल्ली कॕपिटल्सने (Delhi Capitals) कर्णधार बदलला तरी गेल्या आयपीएलमधील (IPL 2021) आपला फॉर्म कायम राखला आहे. गेल्यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती आणि आता तसाच दमदार खेळ करत विजयी सुरूवात केली आहे. सुपर किंग्जविरुध्द (Chennai Super Kings). 189 धावांचे कठीण लक्ष्यसुध्दा त्यांनी अगदी सहजपणे एक षटक आणि दोन चेंडू शिल्लक राखून गाठले. कारण पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) (38 चेंडूत 72 धावा) व शिखर धवन (Shikhar Dhawan) (54 चेंडूत 85 धावा) या सलामीविरांची दमदार कामगिरी आणि त्यांनी साडेतेरा षटकात दिलेली 138 धावांची सलामी.

या सामन्याचा निकाल लागला तो पहिल्या पॉवरप्लेमध्येच. त्यात जिथे चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सहा षटकात फक्त 33 धावाच जमवता आल्या आणि दोन गडीसुध्दा गमावले तिथे दिल्लीने या पहिल्या सहा षटकातच एकही गडी न गमावता 65 धावा जमवल्या होता. म्हणजे दिल्लीचा धावांचा वेग चेन्नईच्या दुप्पट होता आणि तिथेच सामन्यातून धोनीचा संघ बाद झाला. गंमत म्हणजे ड्वेन ब्राव्होसारख्या फलंदाजाला नवव्या क्रमांकावर ठेवणाऱ्या सुपर किंग्जची फलंदाजी फळी अगदी मजबूत आणि तळापर्यंत आहे अशी चर्चा होती पण कॕपिटल्सकडे रबाडा व नोर्जेसारखे गोलंदाज नसतानाही सुपर किंग्जची फलंदाजी तशी दिसून आली नाही. शेवटी 15 ते 20 धावा कमी पडल्या हे धोनीनेसुध्दा मान्य केले आहे.

दिल्लीचा धोनीच्या संघावर हा सलग तिसरा विजय ठरला. गेल्यावर्षीच्या दोन्ही सामन्यात त्यांनी चेन्नईला मात दिली होती.

कर्णधार म्हणून विजयी सुरुवात करणारा रिषभ पंत म्हणाला की मी धोनीकडून बरंच शिकलोय. त्यामुळे त्याच्यासोबत नाणेफेकीला उतरणे खासच होते. नोर्जे व रबाडा उपलब्ध नव्हते. मधल्या टप्प्यात कोणाला गोलंदाजी द्यायची याबद्दल मी चिंतीत होतो पण आवेश खान व टॉम करन यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये धवन व शाॕ यांनी उत्तम खेळ केला पण स्पर्धेची आत्ता कुठे सुरुवात आहे. त्यामुळे नेट रनरेट विचार मनात नव्हता हे त्याने स्पष्ट केले.

धोनीने पराभवाचे कारण देताना म्हटलेय की, आमचे गोलंदाज कमी पडले. धावा कमी झाल्याबद्दल धोनी म्हणाला की, जेंव्हा ओलसरपणा असतो, दव असते त्यावेळी जादा धावा व्हायला हव्यात. साडेसात वाजता डाव सुरु होतो त्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याला दवाचा लाभ कमी मिळतो म्हणून आम्ही 15 ते 20 धावा अधिक करायला हव्या होत्या. गोलंदाजीत कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.त्यांचे फलंदाज आक्रमक मूडमध्ये होते आणि काहीवेळा खराब चेंडू टाकले गेल्याने चेंडू सीमापार झाले.यातून आम्हाला धडा घ्यावा लागणार आहे.

अवेश खानने धोनीला शून्यावरच बाद करुन,आपल्याला संधी दिल्याचा निर्णय योग्य ठरवला. त्याला इशांत शर्माच्या जागी खेळवण्यात आले. ख्रिस वोक्सनेही नवा चेंडू चांगला हाताळत कॕपिटल्सला रबाडा व नोर्जेची उणिव जाणवू दिली नाही. वोक्सने 18 धावात दोन तर,आवेशने 23 धावात दोन गडी बाद केले.

सुपर किंग्जच्या सँटनर व गायकवाड यांनी पृथ्वी शॉचे जे झेल सोडले ते त्यांना चांगलेच महागात पडले. आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर अपयशी ठरलेला आणि कालचा शॉ अगदी वेगळा होता. विजय हजारे ट्राॕफी स्पर्धेतलाच फॉर्म कायम ठेवताना 9 चौकार व 3 षटकार लगावले आणि चेंडू व शरीरात फार अंतर न ठेवता खेळण्याचा त्याला फायदा झालेला दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button