धोनीचे तरुण खेळाडूंबद्दल धक्कादायक विधान, काय म्हणाला…?

Mahendrasingh Dhoni

आयपीएल २०२० (IPL 2020) मधील राजस्थान रॉयल्सविरुध्दच्या (Rajsthan Royals) पराभवानंतर ‘माही’ महेंद्रसिंग धोनीने (Mahendrasingh Dhoni) एक अतिशय धक्कादायक विधान केले जे त्याच्याकडून अजिबात अपेक्षित नव्हते. धोनीचे हे विधान ऐकून बहुतांश क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला असेल की हा पूर्वीचाच धोनी तो आहे का? हा तोच धोनी आहे का, जो नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी व प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जायचा?आम्हाला नव्या व तरुण खेळाडूंमध्ये पाहिजे तशी चमक दिसत नसल्याने त्यांना सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यंदाच्या मोसमात खेळवत नाही, असा धोनीच्या म्हणण्याचा रोख होता. मात्र त्याच्या या विधानानेच धोनी किती बदललाय याची चर्चा सुरु झाली आहे.

रॉयल्सकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर चेन्नईच्या प्लेआॅफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना धोनी म्हणाला कीे, सर्वच गोष्टी तुम्हाला अनुकूल असतात असे नाही. काही चुकतेय का हे आम्हाला बघायला हवे. या प्रक्रियेत निकाल हे बाय प्रॉडक्ट आहे. फार बदल करुन चालत नाही कारण तीन- चार सामन्यांनंतर कोणत्याच गोष्टीची खात्री नसते. आमच्या खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना येऊ नये असे आम्हाला वाटते . यंदाच्या मोसमात नव्या व तरुण खेळाडूंना आम्ही संधी देत नाहीत याची टीका मी समजृू शकतो. कदाचित आम्हाला त्या खेळाडूंमध्ये तेवढी चमक दिसली नसेल. पुढच्या सामन्यांमध्ये कदाचित आम्ही त्यांना खेळवू आणि ते दडपणाशिवाय मुक्तपणे खेळू शकतील.

आधीच आपली स्वत:ची व संघाची खराब कामगिरी, गमावलेला फिटनेस आणि पंचांवर दडपण आणण्याच्या घटनांनी धोनीने नाराजी ओढवून घेतली आहे. त्यात आता या विधानाची भर पडली आहे. त्यामुळे धोनीवर टीका होणार नसती तरच नवल!

अपेक्षेप्रमाणे लगेचच सोशल मीडियावर प्रतिक्रिया यायला लागल्या त्यात धोनीवर जोरदार टीका होत आहे. धोनीचे तरुण खेळाडूंबद्दलचे हे मत फारच बोचणारे आहे कारण त्यांचा काहीेच दोष नाही. त्याने खरं तर संघातील ज्येष्ठ खेळाडूंना दोष द्यायला हवा कारण ते काहीच करून नाही राहिले. एवढ्या वर्षात आम्हाला माहित असलेला धोनी असा नव्हता. जिंकलात तर सिनियर्सनी क्रेडीट घ्यायचे हरलात तर त्यांच्या पाठीशी उभे न राहताही नवोदीत खेळाडूंना द्यायचा हे बरोबर नाही अशी टीका धोनीवर आता होत आहे.

चाहत्यांनी जगदीशनचे उदाहरण दिले आहे. त्याला संधी मिळालीे तेव्हा त्याने त्याचे काम केले मग त्याच्यातही चमक दिसली नाही का, असा सवाल काहींनी केला आहे. सीएसकेच्या अपयशाचे कारणच मुळात त्यांची बुढ्ढा गँग आहे. खरं तर या संघाचे नाव आता चेन्नई सुपरकिंग्ज ऐवजी सुपर अंकल असे ठेवायला हवे असे एकाने म्हटले आहे.

एकाने म्हटलेय की धोनी, तुला तरुणपणातच कर्णधारपद मिळाले होते हे विसरू नकोस. आणि आता तुला तरुणांवर विश्वास नाही हे अजब आहे. त्यांना तुम्ही संधीच दिली नाही तर….हे अतिशय अन्यायकारक विधान आहे. जगदीशन अतिशय चांगला खेळला पण त्याला पुन्हा संधीच दिली नाही. केदारमध्ये असे काय गुण दिसतात की वारंवार त्याला खेळवले जाते असेही काहींनी धोनीला विचारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER