धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये शतकाविना सर्वाधिक धावा

MS Dhoni IPL

आयपीएलच्या (IPL) 13 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 53 शतकी खेळी नोंदल्या गेल्या आहेत. त्यात सर्वाधिक सहा शतकं ख्रिस गेलच्या (Chris Gayle) आणि पाच शतकं विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहेत. डेव्हिड वाॕर्नर व शेन वाॕटसनच्या नावावर चार शतके आहेत. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) 4632 धावा केल्या आहेत. मात्र त्यात त्याचे एकही शतक नाही. शतकाशिवाय आयपीएलमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. धोनीच्या नावावर 23 अर्धशतकं आहेत पण शतक एकही नाही. त्याची 84 धावांची खेळी सर्वोच्च आहे.

रॉबिन उथप्पाच्या 4607 धावांमध्ये आणि गौतम गंभीरच्या 4217 धावांमध्येही शतकी खेळी एकसुध्दा नाही. याप्रकारे आयपीएलमध्ये चार हजाराच्यावर धावा करुनही शतक न केलेले हे तीन फलंदाज आहेत.

सांघिक शतकांचा विचार केला तर किंग्ज इलेव्हन पंजाब (KingsXI) व रॉयल चॕलेंजर्स बंगलोरतर्फे (RCB) सर्वाधिक प्रत्येकी 13 शतकी खेळी झाल्या आहेत. दिल्ली कॕपिटल्स/ डेअरडेव्हिल्सतर्फे 10 शतके लागली आहेत. राजस्थान रॉयल्सतर्फे मुंबई इंडियन्सतर्फे 4, डेक्कन चार्जर्स/ सनरायझर्स हैदराबादतर्फे 5 शतकी खेळी झाल्या आहेत पण कोलकाता नाईट रायडर्सतर्फे फक्त एकच शतकी खेळी झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सतर्फेची एकमेव शतकी खेळी अतिशय विशेष आहे कारण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात पहिल्या म्हणजे शुभारंभाच्या सामन्यातील ती खेळी आहे. म्हणजे केकेआरतर्फे आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात शतक झळकावले मात्र त्यानंतर आजतागायत त्यांचा इतर कोणताही फलंदाज आयपीएलमध्ये शतकी खेळी करू शकलेला नाही आणि असा तब्बल 12 मोसमात शतकी खेळी करु न शकलेला केकेआर हा एकमेव संघ आहे.

क्रिकेटरसिकांना आठवत असेल तर आयपीएलचा शुभारंभाचा सामना 18 एप्रिल 2008 रोजी खेळला गेला होता त्यावेळी बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरचा सलामीवीर ब्रेंडन मॕक्क्युलमने 158 धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर केकेआरच्या कोणत्याही फलंदाजाला शतक करणे जमलेले नाही. आता यंदा तरी ते जमेल का, हेच बघायचे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button